सुशांत सिंह राजपूतला नेहमी जाणवायची आईची कमतरता

बॉलीवूडचा दिवंगत स्टार सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput)  याचा १४ जून रोजी स्मृतीदिन आहे. १४ जून २०२० रोजी  सुशांतने या जगाचा निरोप घेतला होता. हसरा, खेळकर, भावनाप्रधान आणि स्वप्नाळू असलेल्या सुशांतला भविष्यात बऱेच काही करायचे होते. पण त्याची ही बकेट लिस्ट अपूर्णच राहीली.

ऐन लोकप्रियतेच्या कळसावर असताना सुशांतची झालेली अशी एक्झिट त्याच्या जगभऱातील चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. पण वरवर नेहमी आनंदात दिसणारा सुशांत मनात मात्र अस्वस्थ होता. तो १४ वर्षाचा असताना त्याच्या आईचे उषा देवी यांचे निधन झाले.

त्यामुळे सुशांतला आईचा सहवास फारसा लाभला नाही. त्याला आईची ही कमतरता नेहमी जाणवायची. आईवर त्याचे अमाप प्रेम होते. आईच्या आठवणीचा टॅटूदेखील त्याने पाठीवर काढला होता. सुशांतचा हा टॅटू सोशल मीडियावरही चर्चेत होता.

 

सुशांत सोशल मीडियावर आईसोबतचे फोटोही शेअर करायचा. आईच्या निधनानंतर तो एकटा पडला होता. पण त्याच्या बहीणींनी त्याला आईची माया लावत त्याला मातृदुखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण सुशांत कधीच आईच्या विरहातून बाहेर आला नाही. जेव्हा तो एकटा किंवा उदास असायचा तेव्हा तो आईबद्दल सोशल मीडियावर पोस्ट टाकायचा.

आईच्या आठवणीत तो रमायचा. तिच्या निधनानंतर तिच्या अपूर्ण राहीलेल्या इच्छा तो पू्र्ण करत होता. सुशांतच्या या आठवणी आजही बिहारमधील नागरिकांच्या स्मरणात आहेत. सुशांत बिहारमधील कौसा येथला. तर त्याचे आजोळ खगडीया जिल्ह्यातले. तेथील बागमती नदी किनाऱ्याजवळील बौरने गावात त्याच्या आईचे माहेर आहे .

या गावात येण्यासाठी बोटीतून यावे लागते. दुसऱा पर्याय नाही. पण सुशांत मोठा स्टार झाल्यानंतरही आईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येथे यायचा. १३ मे २०१९ रोजी सुशांत आईचा नवस फेडण्यासाठी बोटीतून आजोळी आला होता. येथे आल्यावर त्याने मुंडन केले. सुशांतसारखा स्टार साध्या बोटीतून गावात आल्याचे बघून स्थानिकांना अपार आनंद झाला होता. त्याचा साधेपणा पाहून सगळेच हरखून गेले होते. सुशांत जरी आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणीतून तो कायम त्याच्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.