मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) दिसून येत असलेली वाढ पाहता, नागरिकांचे जीवनमान सुकर ठेवण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशात कार्यरत सर्व महापालिका, पोलीस तसेच अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी वायू प्रदूषण नियंत्रणास प्राधान्य देऊन अत्यंत काटेकोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (take measures to control air pollution; mumbai municipal commissioner bhushan gagrani directed the system)
उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत कान उपटल्याने मुंबई महापालिकेसह सर्व यंत्रणांना कामाला लागावे लागले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे,मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या समन्वय समितीची पाचवी बैठक मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
समन्वय समितीच्या या बैठकीत मुंबई महानगरातील विविध यंत्रणांकडून वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदुषणाची दखल घेत सर्व यंत्रणांनी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करत सर्व यंत्रणांनी ज्या भागात वायू गुणवत्ता निर्देशांक खालावलेला आहे त्या परिसराकडे विशेष लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. त्या परिसरातील 5 किलोमीटर अंतर परिसरातील वायू प्रदुषणासाठी कारणीभूत ठरणार्या घटकांकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे.
वायू प्रदूषण नियंत्रण ही मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व यंत्रणांची सामुहिक जबाबदारी आहे. एखाद्या यंत्रणेने खूप प्रभावी कामगिरी केली तरी दुसरीकडे, एखाद्या भागात वायू गुणवत्ता निर्देशांक खालावलेला असल्यास त्याचे परिणाम संपूर्ण महानगर प्रदेशावर होईल. त्यामुळे, प्रत्येक यंत्रणेने सामुहिकपणे आणि अत्यंत काटेकोरपणे उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही भूषण गगराणी यांनी दिल्या.
समन्वय समिती
मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar