घरमुंबईमुंबई विद्यापीठात पुस्तके घेताहेत अखेरचा श्वास!

मुंबई विद्यापीठात पुस्तके घेताहेत अखेरचा श्वास!

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयामध्ये लाखो पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ आहेत. ही पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि प्रबंधाचा अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण केले आहे.

पुस्तके हे ज्ञानाचा स्त्रोत असून, त्यांना गुरूचा दर्जा दिला असताना मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील पुस्तके अखेरचा श्वास घेत आहेत. ग्रंथालयाची दुरवस्था झाली असून, ग्रंथालयातील दुर्मीळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे, प्रबंध हे पोत्यामध्ये कोंबून सिमेंट, वाळूच्या ढिगार्‍यात ठेवण्यात आली आहेत, अनेक पुस्तके हे वाळवीचे खाद्य बनले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष केले जात असताना आता स्वत:चे अस्तित्त्व टिकवण्यासाठी पुस्तकांवरही आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे निदर्शनास आणणारे खरमरीत पत्र सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना लिहिले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयामध्ये लाखो पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ आहेत. ही पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि प्रबंधाचा अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण केले आहे. विद्यापीठातील या ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर अनेक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक यांच्याकडून करण्यात येतो. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथसंपदेची खाण असलेल्या या ग्रंथालयाची मागील अनेक वर्षांपासून दूरवस्था होत असल्याची बाब मे २०१९ मध्ये सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सहा महिन्यांनी नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु विद्यापीठाच्या संथ कारभारामुळे तीन वर्षे उलटली तरी दुरुस्तीचे काम रखडले आहे. दुरुस्तीसाठी ग्रंथालयातील पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे योग्य पद्धतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आवश्यक असताना विद्यापीठाने ही ग्रंथसंपदा पोत्यामध्ये कोंबून सिमेंट व वाळूचे ढिगारे ठेवलेल्या भागामध्ये ठेवली आहेत. अनेक पुस्तके व्हरांड्यामध्ये धूळ खात पडली असून, पुस्तकांना वाळवी लागलेली आहे. विद्यापीठाकडे ५० वर्षांहून जुनी असलेली वर्तमानपत्रे, विद्यार्थ्यांचे प्रबंध अत्यंत वाईट अवस्थेत आहेत.

- Advertisement -

कर्मचार्‍यांचा जीव मुठीत

ग्रंथालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, तिचा कोणताही भाग कधीही कोसळू शकतो. अशा भयानक अवस्थेत असलेल्या या इमारतीमध्ये कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत, त्याचसोबत विद्यार्थीही अभ्यास करत आहेत. दुरुस्तीची ठोकठाक, धुळ, माती, रेती आणि सिमेंटचा त्रास करून विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथालयातील स्वच्छतागृहांची अवस्थाही वाईट असल्याचे थोरात यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

स्कॅनर पडून

काळानुरुप ग्रंथालय डिजिटल करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने ७५ ते ९० लाख रुपये खर्च करुन स्वयंचलित स्कॅनर विकत घेतला होता. मात्र हा स्कॅनर चालवण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ विद्यापीठाकडे नसल्याने पाच वर्षांपासून हा स्कॅनर विनावापर पडून आहे, असे थोरात यांनी निदर्शनास आणले आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -