‘मुंबईची भाषा हिंदी नसून मराठी आहे, मला माफ करा’

'मुंबईची भाषा हिंदी नसून मराठी आहे, मला माफ करा', असे म्हणत 'बापुजी' हे पात्र साकारणारे कलाकाम अमित भट यांनी मनसेच्या नावाने मराठीमध्ये पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे.

tarak mehata ka ulta chashma actor amit bhat apologize to mns for hindi language comment
तारक मेहता का उलटा चष्मा - बापूजी

‘तारक मेहताचा उलटा चष्मा’ या मालिकेचे मजेशीर पात्र जेठालालचे वडील बाबूजी यांच्या तोंडी ‘मुंबईची भाषा हिंदी’ असल्याचा संवाद दाखविण्यात आला आहे. या संवादावरून सोशल मीडियावर ताशेरे ओढले गेले. तसेच मालिकेतील संवादावर आक्षेप घेत मनसेने वाहिनीकडून माफीची मागणी केली. त्यानंतर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘आपण सर्व भाषांचा सन्मान करतो’ असे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचप्रमाणे या मालिकेत ‘बापुजी’ हे पात्र साकारणारे कलाकाम अमित भट यांनीही याप्रकरणात माफी मागितली आहे.

मराठीत पत्र लिहून मागितली माफी

‘बापुजी’ हे पात्र साकारणारे कलाकाम अमित भट यांनी मनसेच्या नावाने मराठीमध्ये पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘मला स्क्रिप्टमध्ये लिहून देण्यात आलेला संवाद मी कॅमेऱ्यासमोर बोललो. मात्र, मुंबईची भाषा ही हिंदी नसून मराठी आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो’, अशा शब्दात त्यांनी माफी मागितली आहे.

नेमके काय आहे प्रकरण

या मालिकेतील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा…हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आला आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधून कसा संवाद साधणार हे दाखवण्यात आले आहे. दरम्यान, बापुजींच्या तोंडी, मुंबईची भाषा…हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन मनसेने आक्षेप घेत मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे. तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. त्यामुळे यांची मस्ती उतरवावीच लागेल. यामध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते. मालिकेतील संबंधितांनी त्वरीत माफीनामा सादर करावा, अशी मागणी मनसेच्यावतीने अमेय खोपकर यांनी केली होती.


हेही वाचा – स्वप्नील जोशी म्हणतो मुंबईची भाषा मराठीच, विषय कट