मुंबईः मुंबईत क्षयरोग विषाणूच्या व्हेरिंएंटमुळे क्षयरोगाचा प्रसार वाढला आहे. २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत क्षयरोग रुग्णांची संख्या १.६७ लाखावर गेली आहे. त्यापैकी १.४३ लाख रुग्णांवर पालिकेकडून उपचार झाले. त्यामध्ये, पुरुष रुग्णांची संख्या ६८ हजार, तर महिला रुग्णांची संख्या ७५ हजार एवढी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये, संपूर्ण उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ८६ हजारांवर आहे. तसेच, २०२० ते २०२२ या कालावधीत मुंबईत क्षयरोगाने पीडित ७,५५१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सन २०२० मध्ये ३७,९४३ रुग्ण व २,२८३ रुग्णांचा मृत्यू, २०२१ मध्ये ४९,५६४ रुग्ण व २,७०५ रुग्णांचा मृत्यू तर २०२२ मध्ये ५६,११२ रुग्ण व २,५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच गेल्या तीन वर्षात १,४३,६१९ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यापैकी एकूण ७,५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे क्षयरोग रुग्णांमध्ये १५ – ४५ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. तर १५ वर्षांपर्यंतच्या वयोगतील मुलांचे प्रमाण ९ टक्केपर्यंत असल्याचे पालिका आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.
मुंबईकरांचे राहणीमान, प्रतिकार शक्तीचा अभाव, सार्वजनिक ठिकाणी कुठेही व कसेही थुंकणे, शिंकणे, खोकणे आदी कारणे रुग्ण वाढीसाठी कारणीभूत असल्याचे पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगल गोमारे यांनी सांगितले.
जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मंगला गोमारे व डॉ. वर्षा पुरी यांनी क्षयरोग व उपाययोजना आदींबाबत शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली.
क्षयरोग विषाणूच्या व्हेरिंएंटमुळे क्षयरोगाचा प्रसार वाढलेला आहे. त्यामुळे क्षयरोगाला रोखण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकारे जनजागृती करणे, रुग्ण शोधून काढणे, त्यांच्या चाचण्या करून त्याचे निदान करून त्यांना मोफत औषधोपचार देणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र क्षयरोग रूग्णांमध्ये नेमक्या कोणत्या व्हेरिंएंटची लागण झाली आहे याचा शोध घेण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात येणार आहेत. क्षयरोग विषाणूच्या व्हेरिंएंटनुसार रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार करणे करणे शक्य होणार आहे. २०३० ऐवजी २०२५ पर्यन्त मुंबई क्षयरोग मुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे, असा दावा कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केला आहे.