गुन्हेगारांच्या पळवाटांना तांत्रिक वेसण

गुन्हे दोषसिद्धीत मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अव्वल

सखोल तपास आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर आरोपींना दोषी ठरवण्यात मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकार्‍यांनी सखोल चौकशी आणि तांत्रिकृष्ट्या अचूक अहवाल सादर करीत हे यश मिळवले आहे. त्याच आधारे मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने गुन्हे दोषसिद्धी करण्यामध्ये महाराष्ट्रात ८९.६३ टक्के गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

भारतीय दंडसंहिता (भादंवि) अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ५५. ३६ टक्के आहे. नुकतीच या वर्षीच्या दोषींची आकडेवारी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्व पोलीस आयुक्तालयांमधून गुन्हे सिद्ध करण्यामध्ये मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला ८९.६३ टक्के गुण मिळाले आहेत.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२०मध्ये करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था आबाधित ठेवण्याचे काम अधिकार्‍यांमार्फत अत्यंत चोखपणे सुरू आहे. शिवाय गुन्हेगार हाती आल्यानंतर कुठल्याही पळवाटा काढून तो हातातून निसटू नये याचीही अधिकार्‍यांकडून खबरदारी घेण्यात येत असल्याचे या कामगिरीवरून दिसत आहे.

क्रमवारी
मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयापाठोपाठ अमरावती दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाचे दोषसिद्धीचे प्रमाण ५८.४९ टक्के आहे. नवी मुंबई ५४.७८ टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर ठाणे शहर ५४.०८ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ५२.१८ टक्क्यांसह मुंबई दोषसिद्धीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूर पोलीस आयुक्तालय ५१.६३ टक्के गुणांसह राज्यात सहाव्या, तर नाशिक पोलीस आयुक्तालय शेवटच्या स्थानावर आहे.