क्लस्टरमधील रहिवाशांचे म्हाडाच्या योजनेत तात्पुरते पुनर्वसन

राधाकृष्ण विखे पाटील यांची ठाण्यात माहिती

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची पालिका कार्यालयात भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचे स्वागत केले.

ठाण्यात क्लस्टरसारखी योजना सुरू होत आहे. मात्र, ही योजना राबवत असताना येथील रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन म्हाडा आणि विविध योजनांमध्ये केल्यास हे काम लवकर मार्गी लागू शकेल. तसेच परवडणार्‍या घरांची योजनाही मार्गी लावण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या सर्वच योजनांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
गुरुवारी त्यांनी ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जायस्वाल यांची भेट घेतली. ठाण्यात म्हाडा, एसआरए अंतर्गत विविध योजना सुरू आहेत. तसेच परवडणार्‍या घरांची योजनाही राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच म्हाडा संदर्भातील काही प्लॉटची मागणीसुध्दा महापालिका आयुक्तांकडून झाली आहे. त्यानुसार या संदर्भात पत्र देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी आणि या योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा मोर्चा योग्यच
शिवसेनेने पिक विमा कंपन्यांच्या विरोधात काढलेल्या मोर्चाचे समर्थन करताना विखे पाटील यांनी या योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शिवाय या कंपन्यांवर दबाव आणण्याची गरज होती. त्यामुळे शिवसेनेने जे केले ते योग्यच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना मागील साडेचार वर्षात विविध योजनांचा लाभ झाला आहे. यापूर्वी मी विरोधी बाकावर होतो. त्या वेळेस मी ज्या काही मागण्या केल्या होत्या. त्या भाजप सरकारने साडेचार वर्षात पूर्ण केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

विधानसभेपूर्वी क्लस्टरचा नारळ वाढवणार
ठाणे शहरात सध्या सहा विभागात क्लस्टरचा सर्व्हे जवळजवळ पूर्णत्वास आला आहे. त्यानुसार मागील कित्येक वर्ष रखडलेल्या या योजनेचा नारळ येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढविला जाईल, असे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. तसेच या योजनेतील लीजच्या प्रश्नावरही तोडगा काढण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.