घरताज्या घडामोडीनालासोपार्‍यातील दोन हॉस्पिटल्समध्ये दिवसभरात दहा जणांचा मृत्यू

नालासोपार्‍यातील दोन हॉस्पिटल्समध्ये दिवसभरात दहा जणांचा मृत्यू

Subscribe

- ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या बातमीने खळबळ, - नातेवाईकांचा हॉस्पिटलबाहेर गोंधळ

नालासोपार्‍यातील विनायका हॉस्पिटलमध्ये सोमवारी दिवसभरात सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची बातमी पसरल्याने मृतांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलबाहेर गोंधळ घातला होता. अखेर उशिरा रात्री पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान, नालासोपार्‍यातील रिद्धीविनायक आणि विनायका या दोन वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये मिळून एकाच दिवशी १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

वसईत सोमवारी सकाळपासूनच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात माजी महापौर राजीव पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल करून त्यामध्ये नालासोपार्‍यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी एका नगरसेवकासह तीन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. मात्र, ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावू शकतात; पण, हेच एक कारण असतेच असे नाही. शासकीय यंत्रणा जागे करण्यासाठी कडक क्लिप पाठवली होती. त्यामागे हाच एकमेव हेतू होता. त्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नाही. माझ्या क्लिपमुळे वसईत ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला असून यापुढे तुटवडा होणार नाही. यादृष्टीने सरकारी यंत्रणा कामाला लागल्याचे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

वसईतील अनेक खासगी हॉस्पिटल व्हेंटिलेटरची गरज असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत नव्हते. परिणामी वसईत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या बातम्यांनी वेग घेतला होता. असे गोंधळाचे वातावरण सुरू असतानाच नालासोपार्‍यातील विनायका हॉस्पिटलमध्ये सोमवारी दिवसभरात सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. रुग्ण ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने दगावल्याची बातमी पसरली आणि वातावरण तंग झाले. संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा हॉस्पिटलबाहेर गोंधळ घातला. त्यात काही राजकीय पक्षाचे पदाधिकारीही सामील झाल्याने गोंधळ अधिक वाढला होता. अखेर तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला समजावून शांत केले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही घटना घडलेली नाही. सात वाजता ऑक्सिजनची तपासणी केली तेव्हा आणखी चार तास पुरेल इतका साठा उपलब्ध होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाची रक्कम भरायची असेल तर भरू शकतात किंवा भरायचे की नाही त्याबाबत त्यांनीच निर्णय घ्यावा, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, एकीकडे महापालिकेकडून ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात येत होते. तर आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने त्याचा ताबडतोब पुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता.

पालिकेकडून मृतांचा आकडा लपवण्याचा प्रयत्न
वसई-विरार परिसरात सोमवारी दिवसभरात बारा रुग्णांचा मृत्यू झाला होता. महापालिकेने मात्र दोनच मृत्यू झाल्याचे म्हटले होते. एकट्या विनायका हॉस्पिटलमध्ये सात आणि रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये तीन जण मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे महापालिका हद्दीत बारा मृत्यू झाले असताना महापालिकेकडून दोनच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.

महापालिकेकडून उशिराने सारवासारव
ऑक्सिजनचा साठा संपल्याच्या बातम्या दिवसभर फिरत होत्या. परिणामी विनायका हॉस्पिटलमधील ७ जण आणि रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये तीन जण ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडल्याने नालासोपार्‍यातील वातावरण तंग झाले होते. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या गदारोळात महापालिकेची आरोग्य यंत्रणा गपगार होती. मंगळवारी सकाळी महापालिकेने प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

१२ एप्रिल रोजी विनायका हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये ७ व रिद्धी विनायक या खासगी रुग्णालयामध्ये ३ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला ही बातमी वस्तूस्थितीस अनुसरून नाही. विनायक हॉस्पिटल या खाजगी कोविड रुग्णालयास लिओ ऑक्सिजन एजन्सी या ऑक्सिजन पुरवठादाराकडून ११ एप्रिल रोजी १३९ जम्बो सिलिंडर व १ डुरा सिलिंडर (१ डुरा सिलिंडर म्हणजे २८ जम्बो सिलिंडर) असे १६६ जम्बो सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला होता. एका जम्बो सिलिंडरमध्ये सात हजार लिटर ऑक्सिजन असून त्याप्रमाणे पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता, ही वस्तुस्थिती आहे.

रिद्धीविनायक हॉस्पिटल या खासगी कोविड रुग्णालयास खासगी ऑक्सिजन पुरवठादाराकडून ११ एप्रिल रोजी ५० जम्बो सिलिंडर तर १२ एप्रिल रोजी ६० अशा एकूण ११० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला होता. वसई-विरार महापालिका परिक्षेत्रात एकूण ८ खासगी कोविड रुग्णालये असून अशाप्रकारे ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब इतर कोणत्याही रुग्णालयात उद्भवलेली नाही. महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेऊन१२ एप्रिल रोजी दहा टन ऑक्सिजन प्राप्त करून घेतला असून स्वतः ची दोन व इतर खासगी रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे उपरोक्त २ रुग्णालयांमधील अत्यावस्थ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झालेला आहे. ही बाब वस्तूस्थितीस धरून नाही, असा खुलासा महापालिकेने घटना घडल्यानंतर दुसर्‍या दिवशी करून असंवदेनशिलता दाखवून दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -