घरमुंबईसिव्हील रूग्णालयाच्या स्थलांतराचे टेन्शन !

सिव्हील रूग्णालयाच्या स्थलांतराचे टेन्शन !

Subscribe

राज्याचे आरोग्य सेवा संचालक आयुक्त परिमल सिंह यांनी केला पाहणी, चार जागांचा पर्याय

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे वैद्यकीय केंद्रस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिव्हिल रूग्णालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे इथल्या डॉक्टर, कर्मचारी आणि रूग्णांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या रूग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.

डॉक्टर आणि रूग्णालय या दोघांनाही सोयीचे ठरले अशा ठिकाणीच सिव्हील रूग्णालय स्थलांतरीत करावे लागणार आहे. त्याचे टेन्शन प्रशासनावर असताना गुरूवारी राज्याचे आरोग्य सेवा संचालक आयुक्त परिमल सिंह यांनी सिव्हिल रूग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयाच्या नव्या जागांची पाहणी केली.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, वाडा, मोखाडा, कल्याण, डोंबिवली, पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरीपर्यंतचे रूग्ण सिव्हील रूग्णालयात येतात. ग्रामीण, शहरी भागातील गोरगरीब रूग्णांसाठी खूप मोठा आधार म्हणूनच या रूग्णाकडे पाहले जाते. रूग्णालयात साधारण दररोज ६०० ते ७०० बाह्यरूग्ण तपासणीसाठी येतात.

त्यामुळे सिव्हिल रूग्णालय हे नेहमीच रूग्णांनी गजबजलेले असते. कै. विठ्ठल सायना यांनी १९३६ च्या सुमारास या रूग्णालयाची उभारणी केली. या रूग्णालयाला त्यांचेच नाव असले तरी ते सिव्हील रूग्णालय या नावानेच ते ओळखले जाते. सिव्हील रूग्णालयात एकूण पाच इमारती आहेत. बहुतांशी इमारती जीर्ण झाल्या आहेत.

- Advertisement -

अनेक इमारतींच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले आहे. इमारतींची दयनिय अवस्था आहे. रूग्णांची संख्या जास्त असल्यामुळे बेडच्या अपुर्‍या संख्येमुळे त्यांना जमिनीवर झोपवून उपचार केले जातात. मात्र कोणत्याही रूग्णाला माघारी पाठवले जात नाही. या रूग्णालयात डॉक्टरांची संख्याही अपुरी असल्याने त्याचा फटका अनेकवेळा रूग्णांना सहन करावा लागतो. बालरोग तज्ज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक, मानसोपचार तज्ज्ञ अशा अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे रूग्णांना मुंबईतील सायन, केईएम, जे. जे., नायर आदी रूग्णालयांची वाट धरावी लागत आहे. तसेच न्यूरोलॉजली विभाग नाही. त्यामुळे मोटार अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना तातडीने उपचार मिळत नाहीत.

या रूग्णांना मुंबईला पाठवावे लागते. त्यात बराचसा वेळ लागतो. ठाणे जिल्हा झपाट्याने वाढतोय. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी रूग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. त्यानुसारच सिव्हील रूग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मात्र अजूनही त्याला चालना मिळालेली नाही. सिव्हील रूग्णालयाच्या ठिकाणी नवी इमारत उभारणीसाठी सध्याच्या इमारती पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे रूग्णालय हलवायचे कुठे, हे टेन्शन प्रशासनाला आहे.

या ४ जागांची चाचपणी !

ठाण्यातील कशिश पार्क, साकेत कॉम्पलेक्स, मनोरूग्णालय आणि कामगार रूग्णालय या चार जागांपैकी एका ठिकाणी सिव्हील रूग्णालय स्थलांतरीत करता येऊ शकते. कामगार रूग्णालयात हलविण्याचा विचार सुरू आहे. मात्र कामगार रूग्णालयाच्या डागडुज्जीला साधारण १५ ते २० कोटी रूपये खर्च येणार आहे. त्यामुळे इतर जागांचा विचार सुरू आहे. रूग्णालयाचे स्थलांतराची जागा ही रूग्ण व डॉक्टरांना वाहतुकीच्यादृष्टीने सोयीस्कर असावी. तसेच सिव्हील रूग्णालयाचा सर्व विभाग राहू शकतात का ? आदींचा विचार यावेळी करण्यात येणार आहे.

मनोरूग्णालयाची जागा ही आरोग्य विभागाची असून उर्वरित दोन्ही जागा या महापालिकेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जागांचाही विचार सुरू आहे. या चारही जागांची आयुक्त परिमल सिंग यांनी पाहणी केली. तसेच चारही जागा सोयीस्कर नसल्यास सिव्हील रूग्णालयातील काही भाग इतर इमारतीत हलवून त्याचा एक भाग रिकामा करून तेथे इमारत बांधल्यानंतर, दुसरा भाग रिकामा करून टप्याटप्याने इमारतीचे बांधकाम करण्यात येईल का ? याचाही विचार सुरू आहे असे रूग्णालय सुत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -