Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई वांद्र्यातील भूखंड गावसकरांच्या पदरात

वांद्र्यातील भूखंड गावसकरांच्या पदरात

Related Story

- Advertisement -

लिटल मास्टर सुनील गावसकर यांना वांद्रे कुर्ला संकुलात म्हाडाच्या मालकीचा भूखंड इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता त्याच भुखंडावर हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, स्क्वॅश तसेच प्रशिक्षणार्थींच्या राहण्याची व्यवस्था आणि स्पोर्टस कॅफेटेरिया आदी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात हा भूखंड गावसकर यांच्याकडून काढून घेण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र ठाकरे सरकारने अखेर हा भूखंड गावसकर यांच्या पदरात टाकला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

गावसकर यांनी २७ जानेवारी २०२१ केलेल्या विनंतीनुसार त्यांना बॅडमिंटन, फुटबॉल, टेबलटेनिस या खेळांना देखील परवानगी देण्यात आली असून तसा शासन निर्णय १४ सप्टेंबरला काढण्यात आला आहे. या भूखंडावर क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी, खेळाडू यांना काही दुखापत झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्पोटर्स मेडिसीन सेंटर उभारण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. विविध खेळांमधील तज्ञ तसेच प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यासाठी ऑडिटोरियम उभारण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या खेळ प्रशिक्षण केंद्राला इनडोअर क्रिकेट स्टेडियमऐवजी मल्टी फॅसिलिटीज स्पोटर्स सेंटर विथ इनडोअर आणि आऊटडोअर फॅसिलिटीज हे नाव देण्यासही मान्यता देण्यात आली. या खेळ प्रशिक्षण केंद्रातून मिळणाऱ्या नफ्याच्या प्रमाणित रक्कमेपैकी २५ टक्के एवढी रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार आहे. या भूखंडासंदर्भात म्हाडा वा अन्य कोणात्याही प्राधिकरणाची प्रलंबित देणी असतील ती प्रदान करून म्हाडासोबत भाडेकरारनामा करावा. त्यानंतर भूखंडाचा ताबा मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत प्रत्यक्षात बांधकामास सुरूवात करावी आणि ३ वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण करून ज्या प्रयोजनासाठी भूखंड वितरीत केला आहे त्या प्रयोजनासाठीच याचा वापर सुरू करण्यात यावा,असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.

दरम्यान राज्य सरकारने ३१ वर्षापूर्वी सुनील गावसकर यांच्या ट्रस्टला क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी वांद्रे येथील जागा दिली होती. पण त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही. इतक्या मोठ्या कालावधीसाठी काहीच न केल्यामुळे डिसेंबर २०१९ मध्ये राज्य सरकारने गावसकर ट्रस्ट सोबत झालेला करार संपला असे सांगत भूखंड परत घेण्याची घोषणा केली. म्हाडाच्या एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गावसकर ट्रस्टला संबंधित जागेवर तीन वर्षात अकादमी सुरू करणे बंधनकारक होते. ही जागा ६० वर्षासाठी ट्रस्टला देण्यात आली होती. १९९९, २००२ आणि २००७ मध्ये नियमात आणि अटींमध्ये सुधारणा करण्यात आली. ट्रस्टला बाहेरच्या मार्गाने निधी मिळवण्याची परवानगी देखील देण्यात आली होती. पण २०११ मध्ये भूखंडावर अतिक्रमण झाल्याची तक्रार आली. भाजपचे आमदार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशीष शेलार यांनी भूखंड म्हाडाने परत घ्यावा अशी मागणी करीत यासंदर्भातील पत्रही त्यांनी म्हाडाला दिले होते. गेल्या ३ दशकापासून भूखंडावर काहीच काम झाले नाही. त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही, असे शेलार यांनी म्हटले होते. मात्र आता गावसकर यांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -