घरताज्या घडामोडीसचिन, लतादीदींचे ट्विट कुणाच्या दबावाखाली ? ठाकरे सरकार करणार इंटेलिजन्स चौकशी, भाजपने...

सचिन, लतादीदींचे ट्विट कुणाच्या दबावाखाली ? ठाकरे सरकार करणार इंटेलिजन्स चौकशी, भाजपने चौकशीवर केली टिका

Subscribe

रिहानाच्या ट्विटनंतर एकप्रकारे साखळी स्वरूपात असे ट्विट्स समोर आले. जर एखाद्या व्यक्तीचे ट्विटमध्ये वैयक्तिक मत असेल तर ती गोष्ट समजण्यासारखी आहे. पण भारतातल्या सेलिब्रिटींनी ज्यानुसार ट्विट्स केली आहेत, त्यानुसार भाजपची यामध्ये भूमिका असल्यासाठी वाव आहे. याबाबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आम्ही चौकशीची मागणी केली आहे. या सेलिब्रिटींच्या ट्विट प्रकरणात चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे असे सचिन सावंत यांनी सांगितले आहे. गृहमंत्र्यांनीही या ट्विटमध्ये चौकशी करण्याचे आश्वसन दिले आहे. राज्याच्या इंटेलिजन्स युनिटकडून चौकशीचे आदेश या प्रकरणात देण्यात आले आहेत. नुकत्याच एका झुम मिटींगमध्ये गृहमंत्र्यानी अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांना केंद्राकडून ट्विट करण्यासाठी भाजपवर दबाव होता का याची चौकशी करण्यात येणार आहे. भाजपनेही या चौकशीवर प्रश्न उपस्थित करत गृहमंत्र्यांना टार्गेट केले आहे.

गेल्याच आठवड्यात अनेक सेलिब्रिटी अजय देवगण, अक्षय कुमार, सायना नेहवाल, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी इंडिया टुगेदर हा हॅशटॅग वापरत ट्विट्स केले होते. इंटेलिजन्सकडून करण्यात येणाऱ्या चौकशीत या सगळ्या सेलिब्रिटींवर कोणता दबाव होता का, हे तपासण्यात येईल असे आश्वासन अनिल देशमुख यांनी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना दिले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्यानेच सचिन सावंत यांनी झूम मिटिंगद्वारे मिटिंग घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जगभरातून प्रतिक्रिया आल्या. पॉप स्टार रिहानाने या आंदोलनावर भूमिका मांडल्यानंतर भारतातील अनेक सेलिब्रिटींनीही आपले मत समाज माध्यमांवर मांडले. भारतातील सेलिब्रिटींनी ट्विट करण्याची वेळ आणि या ट्विटमधील मजकुरात असलेले साधर्म्य यामुळेच ही चौकशी होणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जे काही मुद्दे सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत, त्यावर इंटेलिजन्सकडून चौकशी होईल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

देशभरामध्ये विषेशतः पंजाब, हरियाणा, राजस्थान व पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असताना मोदी सरकार या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी शेतकऱ्यांचे दमन करत आहे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही व गांधींचा देश असल्याने भारतामधील लोकशाही परंपरांचा आदर्श जगात घेतला जातो. त्यामुळे मोदी सरकारने अवलंबलेल्या अलोकतांत्रिक पद्धतीचा व शेतकऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल जगामधून चिंता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीगत मतावरती केंद्र सरकार प्रत्युत्तर देत नसताना रिहाना या अमेरिकन पॉपस्टारने केलेल्या ट्विट विरोधात केंद्र सरकारने उत्तर दिले व त्यानंतर त्याच तऱ्हेचे अनेक ट्विट हे बॉलिवूड व क्रीडा क्षेत्रातल्या सेलिब्रिटींनी केले होते.

कोणी व्यक्तीगत पातळीवरती आपले मत व्यक्त करत असेल तर त्या व्यक्तीचा तो संवैधानिक अधिकार आहे त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही परंतु जर दबावाखाली त्यांच्याकडून हे करवून घेतले गेले असेल तर त्याचा निश्चितपणे विरोध होणे गरजेचे आहे. या दबावाच्या शंकेबद्दल पुष्टी करणारी माहिती या ट्विटचे विश्लेषण केल्यानंतर समोर येते. बहुतांश ट्विटमध्ये amicable हा शब्द सारखा येतो. त्यातही अक्षयकुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्विट सयामी जुळ्या व्यक्तीने केल्याप्रमाणे शब्द न शब्द समान आहेत. यातूनच भाजपाने त्यांच्याकडून स्क्रिप्ट देऊन हे ट्विट करवून घेतले या शंकेला बळ मिळते. दुसरीकडे अभिनेता सुनिल शेट्टी यांनी केलेल्या ट्विटमध्ये मुंबई भाजपाचा उपाध्यक्ष हितेश जैन या व्यक्तीला उल्लेखीत करण्यात आलेले आहे. यातून भाजपाचे कनेक्शन होते का याची चौकशी करण्याची गरज निर्माण होते.

- Advertisement -

कृत्रिमरित्या जनमत तयार करण्यासाठी भाजपा असा दबाव आणते का, याची चौकशी होण्याची गरज आहे आणि कनपट्टीवर शस्त्र ठेवण्याची मानसिकता असणारे मोदी सरकार आहे याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचे निर्वहन कोणत्याही दबावाशिवाय करता यावे असे वातावरण निर्माण करणे हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे कर्तव्य आहे आणि त्याचकरिता हे सरकार स्थापन झाले आहे म्हणूनच भाजपाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच गरज भासल्यास या सेलिब्रिटींना मोदी सरकारपासून संरक्षण व मानसिक आधार द्यावा अशी मागणी केली. कोरोनाबाधित असतानाही गृहमंत्र्यांनी या विषयाचे गांभिर्य ओळखून वेळ दिला असेही सचिन सावंत यांनी सांगितले.

कोरोना गृहमंत्र्यांना की मेंदूला

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगशेकर यांच्या ट्विटची चौकशी लावणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाला आहे की त्यांच्या मेंदूला झाला आहे ? असा सवाल भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केला आहे. केवळ मत्सरापोटी आणि द्वेषापोटी महाभकास आघाडी सरकार हे देशाचे भूषण असलेल्या लोकांवर कारवाई केले यावरूनच या सरकारचे डोक फिरल असे ते म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -