ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाने केली सोनू निगमला धक्काबुक्की; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूर येथील एका कार्यक्रमामध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे चेंबूर विधानसभेचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने सोनूला धक्का मारल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सोनूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

Thackeray group MLA's son pushed Sonu Nigam

चेंबूर येथे ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी चेंबूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गायक सोनू निगम याने हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रम सादर केल्यानंतर सोनू निगम हा स्टेजच्या खाली उतरत होता. याचवेळी आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्पेकर याने मागून सोनू निगम यांच्यासोबत घाईमध्ये येऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, यासाठी सोनूच्या अंगरक्षकाने अटकाब केल्याने संतापलेल्या आमदाराच्या मुलाने सोनू निगमला धक्का मारला. त्यानंतर स्वप्नील फातर्पेकर याने सोनू निगमच्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा धक्का दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी सोनू निगम याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ठाकरे गटाचे चेंबूर येथील आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी गेल्या चार दिवसांपासून चेंबूर फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सोनू निगमला देखील आमंत्रित करण्यात आले होते. गायक सोनू निगम याने या कार्यक्रमामध्ये त्याचा जवळचा मित्र रब्बानी मुस्तफा खान याच्यासोबत हजेरी लावली होती. रब्बानी हा दिवंगत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा आहे, जे सोनू निगमचे गुरू होते. रब्बानी खान याला या घटनेत दुखापत झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर कार्यक्रम सुरु असताना आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने सोनूचा मॅनेजर साईराज याच्याशी गैरवर्तन करून असभ्यपणे बोलला. कार्यक्रमानंतर सोनू मंचावरून खाली उतरत असताना आमदाराच्या मुलाने घाईघाईने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान सोनूचा अंगरक्षक हरी याने त्याला शिष्टाचारासह सेल्फी घेण्यास सांगितले. यावेळी स्वप्नील फातर्पेकर याने संतापून हरीला धक्काबुक्की केली. यादरम्यान त्याने सोनू निगमलाही धक्काबुक्की केली. बॉडीगार्ड हरीने लगेच सोनूला पकडून त्याला पडण्यापासून वाचवले. यानंतर आमदाराच्या मुलाने रब्बानी मुस्तफा खान यांना धक्काबुक्की केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

हेही वाचा – शिवसेना, धनुष्यबाण लढाई सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे व शिंदे पुन्हा आमने-सामने

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेच्या वेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या समित ठक्कर यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरला शेअर केला आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या गोष्टीवर आक्षेप घेत मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत तपासणी करत सत्य काय आहे ते उघड करावे असे त्यांनी या व्हीडीवर रिट्विट केले आहे.