‘मुंबईकरांनो सावध व्हा…’, संजय राऊतांचे आवाहन; नेमके प्रकरण काय?

मुंबई महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

MP Sanjay Raut

मुंबई महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच, मुंबईकरांना आवाहनही करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी ट्विटरवरून मुंबईकरांना आवाहन केले आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut Talk On Mumbai BMC Budget 2023-24)

संजय राऊतांच्या ट्वीटमध्ये काय?

“काल मुंबईच्या तिजोरीमध्ये पहिला हात टाकण्यात आला. जवळपास १२ हजार कोटी रुपये महापालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद काल महापालिकेच्या बजेट मध्ये करण्यात आली. केंद्राच्या मित्राने देशाचा बाजार उठवला आता महाराष्ट्राचा तथाकथित मित्र मुंबईचा बाजार उठवेल. मुंबईकरांनो सावध व्हा”, असे ट्वीट करत संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

५२,६१९.०७ कोटींचा व ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप यांच्या निवडणूक ‘ संकल्पाची’ स्पष्ट छाप दर्शवणारा आणि मुंबईकरांसाठी विविध योजना, प्रकल्प, सेवासुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची भरीव तरतूद असलेला सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षासाठीचा ५२,६१९.०७ कोटींचा व ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा आणि कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेला अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांनी शनिवारी मुंबईकरांसाठी सादर केला. विशेष म्हणजे गेल्या वर्षी महापालिकेने ४५ हजार ९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये यंदा १४.५ टक्के वाढ झाली आहे.

अतिरिक्त कर किंवा करात वाढ न करण्याचा निर्णय

महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांना जास्तीत जास्त चांगल्या सोयीसुविधा कशा प्रकारे देता येतील तसेच गेली २५ वर्षे महापालिकेवर एकहाती सत्ता राखणाऱ्या शिवसेनेकडून सत्ता कशी काबीज करता येईल, याची काळजी शिंदे व भाजप सरकारने घेतल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त कर किंवा करात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला.


हेही वाचा – …तर रावण काढून रामायण समजावून सांगा, जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम!