घरफिचर्समायमहानगर ब्लॉगठाकरे आणि परप्रांतीय!

ठाकरे आणि परप्रांतीय!

Subscribe

महाराष्ट्रात सलग दुसर्‍या वर्षी कोरोनामुळे दहीहंडीचे थर लागू शकले नाहीत. पण म्हणून राजकीय हंड्या फुटल्या नाहीत असं समजायची काही गरज नाही. रस्त्यारस्त्यांवर आणि चौकात दिसणार्‍या दहीहंड्या आणि त्या फोडण्यासाठी गोविंदा रे गोपाळाचा जल्लोष दिसला नाही. भाजप किंवा मनसेच्या काही मंडळींनी हंड्या उभारण्यासाठी हालचाल करताच पोलिसांनी आपल्या कायद्याचा बडगा उगारून या गोविंदांना जेरीस आणलं. पोलीस दहीहंडीला मज्जाव करत आहेत हे पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारबद्दलचा निषेध आपल्या खास शैलीत माध्यमांसमोर मांडला. त्यानंतर त्यांचे थोरले बंधू मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील दूरभाष प्रणालीद्वारे ठाण्यातील पहिल्या ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन केलं. हा कार्यक्रम पार पडताना कधी नव्हे ते उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांचा ‘दिघे साहेब’ असा उल्लेख केला. ठाकरे परिवारातील बाळासाहेबांपासून राजकारणात येऊ घातलेल्या तेजसपर्यंत सगळेच ‘साहेब’ आहेत. अशाच साहेबांची मांदियाळी असलेल्या कुटुंबातील कुणी आपल्याच पक्षातील व्यक्तीला ‘साहेब’ म्हटलं तर ती ओघाने झालेली गोष्ट आहे असं समजण्याचं कारण नाही. निवडणुका जिंकण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर येणारी प्रत्येक निवडणूक ही त्या संबंधित व्यक्तीसाठी महत्वाची असते.

साहजिकच उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांचा उल्लेख ‘दिघे साहेब’ असा ठाण्यातल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करणे यात बर्‍याच गोष्टी अंतर्भूत आहेत. कारण आजही ठाण्यावर आनंद दिघेंच्या करिष्म्याची जादू कायम आहे. त्याच आनंद दिघे यांच्या ठाण्यामध्ये गेल्या काही वर्षात विस्तारलेल्या घोडबंदर रोडवरील कासारवडवली या परिसरात सोमवारी एका पालिका उपायुक्तांवर भ्याड हल्ला झाला. पालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेल्या असता अमरजीत यादव या परप्रांतीय फेरीवाल्याने त्यांच्यावर पाठीमागून धारदार चाकूने हल्ला केला. त्याच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना कल्पिता पिंपळे यांची बोटे छाटली गेली त्यापैकीच एक बोट अक्षरशः कापले जाऊन जमिनीवर पडलं. त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांचा अंगरक्षक पुढे सरसावला असता त्याच्यावरही या परप्रांतीय फेरीवाल्याने हल्ला केला. त्यात तो अंगरक्षकही जखमी झाला. त्याचीही बोटं छाटली गेली. फेरीवाल्यांकडून पालिका आयुक्तांवर होणारा हल्ला ही नवी गोष्ट राहिलेली नाही. याआधी पालिकेचे धडाकेबाज अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यावरही हल्ला झालेला आहे. आता कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला हल्ला पालिका आणि पोलीस प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या हल्ल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या काही मिनिटांतच उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून केलेल्या उद्घाटनप्रसंगी ‘ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे’ या आपल्या ‘चुनावी’ घोषणेचा वापर केला. खरंतर ठाकरे हे नेहमीच मराठी माणूस, मराठी अस्मिता, भूमिपुत्रांचा न्याय हक्क यासारख्या मुद्यांवर आपल्या राजकीय पोळ्या अत्यंत कौशल्याने भाजत आलेले आहेत. पण ज्यावेळी मराठी अधिकार्‍यांवर जीवघेणा हल्ला होतो, त्यावेळी ठोस कारवाई होताना दिसत नाही.

- Advertisement -

आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर ठाणे आपलं वाटतंय तर त्यांच्याच ठाण्यात एका धाडसी महिला अधिकार्‍यावर झालेला हल्ला मुख्यमंत्री कशा पद्धतीने घेतात हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. राज ठाकरे हे सातत्यानं अनधिकृत फेरीवाले, परप्रांतीय, बांगलादेशी घुसखोर यांच्याबद्दल आगपाखड करत असतात. त्यामुळे मतांच्या बेगमीसाठी सेनाभवनातच ‘लाई-चन्ना’ करणार्‍या शिवसेनेपासून दुरावलेल्या मनसेला लक्षणीयरित्या जनाधार मिळालेला होता. पण तो जनाधार मनसेच्या नगरसेवकांच्या आणि पदाधिकार्‍यांच्या कार्यशैलीमुळे आणि भरकटलेल्या नेतृत्वामुळे त्यांना कायम ठेवता आला नाही. आता वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेची अवस्था ही अत्यंत केविलवाणी तर झाली आहेच, त्याचप्रमाणे विधानसभेतही त्यांचा फक्त एकमेव आमदार आहे. असं असलं तरी राज ठाकरे यांना माध्यमांच्या विश्वात एक विलक्षण महत्व आहे. ते त्यांच्याकडे असलेल्या वाक्चातुर्यामुळे, शैलीमुळे आणि योग्य वेळी अचूक मुद्दा छेडण्याच्या कौशल्यामुळेच. ठाणे महापालिकेच्या महिला अधिकार्‍यावर झालेल्या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा ऊहापोह केला. या गोष्टी ठाण्याशी संबंधित होत्या. ठाण्याची झालेली भौगोलिक वाढ, सामाजिक स्थित्यंतरंही उद्धव ठाकरे यांनी शब्दबद्ध केली. पण त्याचवेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले असतानाही एका मराठी पालिका उपायुक्तावर आणि त्यांच्या अंगरक्षकावर होणारा हल्ला याचं उद्धव ठाकरेंना विस्मरण व्हावं ही गोष्ट प्रशासनासाठी अत्यंत चिंतेची आहे.

गेली अनेक वर्षं मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेनेचा वरचष्मा आहे. आणि पालिकांमध्ये सेनेची सत्ताही आहे. असं असताना या सगळ्या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिकांची संख्या वाढलेली आहे. १९९५ साली शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यानंतर ४० लाख झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याची योजना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली होती. या योजनेनंतर झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या आयुष्यातील नरकयातना कमी होऊन त्यांना एक चांगली निवासव्यवस्था मिळेल, अशी शिवसेनाप्रमुखांची यामागे कल्पना होती. एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांच्या या योजनेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. पण त्यांच्या पक्षासह इतरही राजकीय पक्षातील काही भ्रष्ट लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि बरबटलेली व्यवस्था यामुळे या बकाल वस्तीत राहणार्‍या नागरिकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच गेली आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये झोपड्यांची संख्या खूपच मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे बिल्डरांनी स्वतःचं उखळ पांढरं करण्यासाठी या योजनेचा जितका घेता येईल तितका गैरफायदा घेतला.

- Advertisement -

साहजिकच त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. एकेकाळी टुमदार असलेली मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारखी शहर प्रचंड मोठ्या प्रमाणात बकाल झाली. त्यामध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीयांनी झोपड्या बांधल्या आणि आपापल्या परिचितांना तिथे वसवण्यात सुरुवात करत व्होट बँकांचे अड्डे वसवले. यातल्या अनेकांनी उपजीविकेचे साधन म्हणून बोगस रिक्षा-टॅक्सी परवाने मिळवले तर काहींनी फेरीचे ठेले बनवून घेतले. इतकंच काय तर अनेक अनधिकृत व्यवसायांचं माहेरघर म्हणून या वस्त्यांकडे पाहिलं जायला लागलं. मतांमुळे स्थानिक नगरसेवक, आमदार या वस्त्या सांभाळायला लागले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. अशाच सगळ्या मंडळींना हाताशी धरून चिरीमिरीच्या आधाराने आपली श्रीमंती वाढवणार्‍या पोलीस, पालिका, वीज मंडळ, महसूल आणि वन विभागामधल्या भ्रष्ट कर्मचार्‍यांनी आणि अधिकार्‍यांनी तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडवलाय. आणि त्याचे परिणाम कधी संदीप माळवी तर कधी कल्पिता पिंपळे यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकार्‍यांवर होणार्‍या हल्ल्यावरून आपल्याला पाहायला मिळताहेत. मुख्यमंत्र्यांना जर ठाणे हे शिवसेनेचे वाटत असेल तर त्यातला मूळ ठाणेकर किंवा विस्तारलेल्या आणि विकसित झालेल्या ठाण्यातील बहुभाषिक नागरिक खरंच सुरक्षित आहे का, हे त्यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उतरून पाहण्याची हीच ती वेळ आहे, असे खेदाने म्हणावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -