Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईThane : ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6 हजार 955 मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज

Thane : ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6 हजार 955 मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज

Subscribe

ठाणे : बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 ची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आज ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणा रवाना झाली आहे.‍ तरी नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यत मतदान करुन आपला लोकशाहीचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.आज 18 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदानकेंद्रावर लागणाऱ्या साहित्याचे वाटप मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 6 हजार 894 ही मूळ मतदान केंद्रे व 61 सहायकारी मतदान केंद्रे अशी एकूण 6 हजार 955 मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रांवर एकूण 8 हजार 273 बॅलेट युनिट, 8 हजार 273 कंट्रोल युनिट तर 8 हजार 962 व्हीव्हीपॅट रवाना झाले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व पोलीस कर्मचारी असे पथक मतदानाच्या दिवशी कार्यरत असणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 6 हजार 955 मतदान केंद्रावर एकूण 7 हजार 717 मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1- 7 हजार 717,   इतर मतदान अधिकारी – 15 हजार 434 अशा एकूण 30 हजार 868 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग व युवा ही तीन नाविन्यपूर्ण मतदान केंद्र असून ही सर्व मतदान केंद्रे सज्ज झाली आहे. सर्व केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष हे सर्व सामान घेवून पोहचले असून मतदानाच्या दिवशी सकाळी 6.00 वा. मॉकपॉल घेवून ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट ही सर्व यंत्रे सुरळीत चालत असल्याची खात्री करुन घेतली जाणार आहे. त्यानंतर सर्व मशीन्स क्लीअर करुन सकाळी 7.00 वा. मतदान प्रक्रियेस सुरूवात होणार आहे. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली असून सर्व मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारीही हजर झाले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील एकूण 6 हजार 955 पैकी महापालिका हद्दीतील 5 हजार 821 तर ग्रामीण भागातील 714 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा असणार आहे. तसेच मतदारांसाठी रांगेमध्ये खुर्च्यांची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रावर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -