घरCORONA UPDATEमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ठाण्यात अधिकाऱ्यांची मनमानी

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ठाण्यात अधिकाऱ्यांची मनमानी

Subscribe

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जीवनावश्यक वस्तू तसेच सेवा २४ तास खुल्या ठेवण्याचे जाहीर पणे सांगत असताना दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात मात्र अधिकाऱ्यांनी मनमानी आदेश काढण्याचा सपाटा लावला असून त्यामुळे आधीच कोरोणा , लॉक डाऊन यामुळे मेटाकुटीस आलेले ठाणेकर अधिकाऱ्यांच्या तऱ्हेवाईक आदेशांनी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. त्यामुळे एकवेळ लॉक डाऊन परवडला. मात्र या अधिकाऱ्यांना वेसण घाला असे म्हणण्याची वेळ ठाणे जिल्ह्यातील जनतेवर आली आहे.

२२ मार्च पासून ठाणे जिल्ह्यात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गेले ५५ दिवस सातत्याने अखंड लोक डाऊन सुरू आहे. लॉक डाऊन चे नियम निकष सवलती जाहीर करण्याचे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसेच संबंधित महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मात्र यामुळे एकीकडे मंत्रालयातून मुख्य सचिवांचे येणाऱ्या आदेश आणि दुसरीकडे जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर काढत असलेले स्वतंत्र देश यामुळे सामान्य जनता मात्र भरडली जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. पहिला लोक डाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घरपोच सेवा देणाऱ्या किराणा दुकानदार यांनाच त्यांची दुकाने उघडता येतील असे आदेश काढले.

- Advertisement -

मोठी सप्लाय चेन असणाऱ्या बिग बजार, डी मार्ट यासारख्या मोठ्या ब्रँडनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. मात्र छोट्या-मोठ्या किराणामालाच्या दुकानांना मात्र या आदेशानंतर टाळी लागली. घरपोच किराणामाल पोहचणे सर्वच छोट्या-मोठ्या दुकानदारांना शक्य नसल्यामुळे ठाणे जिल्ह्यात किराणा मालाची दुकाने उघडता येत नाहीत मात्र त्यातही लोकांच्या हाल-अपेष्टा लक्षात घेऊन गल्लीबोळात अले छोटे-मोठे किराणा दुकानदार पहाटे पाच ते सकाळी आठ अशा वेळेत किराणा मालाची विक्री करतात. सकाळी आठ नंतर पोलीस कारवाई करत असल्यामुळे किराणा दुकानांना टाळे ठोकावे लागते त्यामुळे अनेक गरजूंना किराणा मला सारखी जीवनावश्यक वस्तूही खरेदी करता येत नाही. भाजीपाला विक्रेते कोणतीही परवानगी न घेता पहाटे आणि सकाळच्या वेळेत जर रस्त्यावर उघडपणे भाजीपाला विक्री करू शकत असतील तर किराणा दुकानांना सापत्नभावाची वागणूक कशासाठी असा प्रश्न किराणा दुकानदार विचारत आहेत.

ठाण्याच्या महापालिका आयुक्तांनी तर ठाणे शहरात खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना प्रवेश बंदीच करून टाकली आहे. मुळात ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरात जी खाजगी रुग्णालये दर्जेदार सेवा देऊ शकतात त्या दर्जाची सेवा ठाणे शहराबाहेरील अन्य कोणत्याही शहरांमध्ये तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये आजमितीला उपलब्ध नाही .मात्र असे असतानाही ठाणे पालिका आयुक्तांनी अकस्मातपणे ठाण्यात बाहेरील कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयातील उपचार बंद करून टाकल्याने त्याविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

ठाणे शेजारील कल्याण-डोंबिवली भागात तर याहीपेक्षा भीषण परिस्थिती आहे. कोरोना आणि लॉक डाऊन यामुळे आधीच हवालदिल झालेल्या कल्याण-डोंबिवली करांवर पालिकेने कचरा विलगीकरण याचे आदेश माथी मारले आहेत. केडीएमसीने पालिका क्षेत्रातील सर्व व हाउसिंग सोसायटी यांना कचरा विलगीकरण याचे फतवे काढले आहेत केडीएमसीच्या फतव्यानुसार आता सोसायट्यांनी ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून केडीएमसीला द्यायचा आहे ज्या सोसायट्या ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करणार नाहीत त्यांना शंभर रुपये दंड भरावा लागेल असे आदेश केडीएमसीच्या मस्तवाल अधिकाऱ्यांनी काढले आहेत. मुळात असे आदेश काढण्यापूर्वी संबंधित उप आयुक्ताने केडीएमसीच्या वाहनांमध्ये तरी ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्र ठेवण्याच्या व त्या वाहून देण्याच्या व्यवस्था आहेत का याची खातरजमा करून द्यायला हवी होती. मात्र ते काही न करता लग्नामुळे हवालदिल झालेल्या कल्याण-डोंबिवली करांच्या माथी अकस्मातपणे कचरा विलगीकरण न केल्यास दंड भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे कल्याण डोंबिवलीकरांमध्ये मात्र प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

अर्ध्या जिल्ह्यात दारू दुकाने उघडी

ठाणे जिल्हा हा रेड झोन मध्ये येत असल्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकानांना दारू विक्री करण्यास परवानगी दिली नाही मात्र असे असताना ठाणे जिल्ह्याच्या काही भागात दारू दुकाने उघडली गेली असून शहरी भागात ती पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे दारू दुकान बाबतही ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बोटचेपी आणि सोयीस्कर भूमिका आहे दर दोन दिवसांनी अधिकारी वेगवेगळे आदेश काढण्यात धन्यता मानत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होते का नाही आणि ती कोणी करायची याची खबरदारी मात्र फतवे काढणारे अधिकारी घेताना दिसत नाहीत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तर ठाणे नाशिक हायवे हा मजुरांच्या गाड्यांनी अक्षरशः दुथडी भरून वाहत होता त्यावेळी लॉक डाऊन ची गल्लीबोळात काटेकोर अंमलबजावणी करणारे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त कुठे होते असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे.

पालकमंत्री ठाण्यातच अडकून..

राज्याचे नगर विकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्यातील एक लोकप्रिय नेते आहेत मात्र लॉक डाऊनच्या काळात पालकमंत्री ठाण्याच्या बाहेर पडलेच नाहीत असा नाराजीचा सूर जिल्ह्यातील इतर शहरांमधून व विशेषता ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून उमटतो आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ठाणे शहराप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील अन्य शहरांकडे व ग्रामीण भागाकडे ही लक्ष द्यावे. आणि मनमानीपणे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांना लगाम घालावा अशी भावना सर्वसामान्य ठाणेकर व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -