घरमुंबईदिवाळी पहाट...ठाणे, डोंबिवलीत तरुणाईंची उसळली लाट

दिवाळी पहाट…ठाणे, डोंबिवलीत तरुणाईंची उसळली लाट

Subscribe

प्रतिनिधी:- ढोल ताशांचा गजर, भव्य रंगीबेरंगी रांगोळ्या, मराठी-हिंदी गाण्यांवर थिरकणारी पावले आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या तरुणाईंचा जल्लोष.. असा ठाणे आणि डोंबिवलीतील दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा तरुणाईंचा सळसळता उत्साह पाहावयास मिळाला. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा म्हणजे एक उत्सवच झालाय. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठाणे आणि डोंबिवलीत दिवाळी पहाटचा आनंद लुटताना ठाणे आणि डोंबिवलीकरांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.

दिवाळी पहाट आणि डोंबिवलीतील फडके रोडचे वेगळेच नाते आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करून हजारोंच्या संख्येने तरुण, तरुणींसह ज्येष्ठ मंडळीही श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी फडके रस्त्यावर नेहमीप्रमाणे जमले होते. तरुण-तरुणी पारंपरिक वेश परिधान करून नटून थटून आल्या होत्या. तरुणींनी फॅशनेबल ड्रेसबरोबरच सहावारी, नऊवारी साड्या नेसल्या होत्या. तरुणही शेरवानी वेशात आले होते. प्रत्येकाने आपल्या मित्र-मैत्रिणींना दीपावली व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तरुण-तरुणींच्या अलोट गर्दीने गणेश मंदिर परिसरातील चारही बाजूंचे रस्ते फुलून गेले होते. श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने युवा शक्ती व भक्तीदिन साजरा झाला. फडके रस्त्यावर भव्य अशी सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. विविध रंगांनी वातावरण रंगीबेरंगी होऊन गेले होते.

- Advertisement -

ठाण्यातही असेच चित्र पाहावयास मिळाले. ठाण्यातील राम मारूती मार्ग, गोखले रस्ता, तलावपाळी येथे जमून दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा तरुणाईने यंदाही कायम राखली होती. सकाळपासूनच तरुणाईंची गर्दी जमली होती. रांगोळीचे फोटो मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुण-तरुणींत स्पर्धा लागली होती. दिवाळीच्या स्वागतासाठी ढोल पथक रस्त्यावर अवतरले होते. ढोलांच्या नादाने आसमंत दुमदुमून गेला. यावर तरुणाईंची पावलेही थिरकू लागली. विशेष म्हणजे या ढोल पथकांत मुलींचाही सहभाग होता. मुलांच्या बरोबरीने तितक्याच उत्साहाने नऊवारी साडी परिधान करून त्या वादन करीत होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -