घरमुंबईपाण्यासाठी आता बोअरवेल आणि विहिरींचा शोध सुरु

पाण्यासाठी आता बोअरवेल आणि विहिरींचा शोध सुरु

Subscribe

ठाण्यात होऊ घातलेले मोठमोठे प्रकल्प काही काळ बाजूला ठेऊन त्यावर खर्च होणारा निधी शाई धरणाकडे वर्ग करावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. मात्र याला सोईस्करपणे बगल देत शहरातील ५०० विहिरी आणि १७०० बोअरवेल दुरूस्त करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत प्रशासन आणि सत्ताधार्‍यांनी मंजूर करून घेतला आहे.

सध्या ठाणे शहरातील पाणी टंचाई समस्येने उग्र रुप धारण केले आहे. सदोष पाणी वितरण व्यवस्था आणि पाणी गळती यामुळे भातसा आणि बारवी धरणातून पुरेसा पाणीपुरवठा होऊनही ठाणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी दिव्यातील नागरिकांचा बळीही लोकल धडकेत गेल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाण्याला पाणीटंचाईची बसणारी झळ शिथिल व्हावी, यासाठी शहरातील पर्यायी व्यवस्था म्हणून पाहिल्या गेलेल्या विहिरी आणि तलावांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीने पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत शाही धरणाचा विषय रेटून धरला होता. मात्र सत्ताधार्‍यांनी विहीरी आणि बोअरवेलचा पर्याय निवडल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. नादुरूस्त ५०० विहिरी आणि १७०० बोअरवेल दुरूस्त करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी विहिर आणि बोअरवेलचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन पाणीटंचाईची झळ नियंत्रणात येऊ शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेच्या महासभेत पाणीप्रश्नावर चर्चा झाली. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पाण्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर लोकप्रतिनिधींनी आपले विचार मांडले. पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासोबतच अतिरिक्त पाणी वाढवून देण्याची मागणीही सर्वच नगरसेवकांनी केली. ठाणे महापालिकेच्यावतीने जेव्हा पहिला डीपीआर करण्यात आला, तेव्हा ३५ सीएसआरचा प्रस्ताव होता. आता लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून ५० सीएसआर आणि ५०० किमीच्या जलवाहिनीचे काय झाले, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला.

पाणी वितरण करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे नियम पाळले गेले नसल्याचे उघड झाले आहे. २०११ साली १८ लाख लोकसंख्या होती. मात्र आता लोकसंख्या २२ लाखांच्या घरात गेली आहे. आजच्या घडीला ३९६ एमएलडीची गरज आहे. याकरता वितरण व्यवस्था आणि गळती थांबवण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रयत्न करण्याची गरज आहे. – नजीब मुल्ला, नगरसेवक, ठाणे महापालिका
- Advertisement -

 

ठाणे शहरात सध्या पाणी मुबलक आहे. भातसा धरणातून १०० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी शासनाला पत्र पाठवण्यात आले असून बारवी धरणाबाबत पुनर्वसनाचा प्रश्न सुटल्यास तिथूनही १०० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेल. – रवींद्र खडताळे, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -