कचर्‍यामुळे खारफुटी धोक्यात

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी पट्ट्यात येत असलेल्या नवनवीन प्रकल्पांमुळे 2011 ते 2017 या सात वर्षांत खारफूटीची प्रचंड हानी झाली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खाडी, समुद्रकिनार्‍यामुळे खाडीक्षेत्र मोठे आहे.

thane mangroves
ठाणे येथील खारफुटी धोक्यात

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी पट्ट्यात येत असलेल्या नवनवीन प्रकल्पांमुळे 2011 ते 2017 या सात वर्षांत खारफूटीची प्रचंड हानी झाली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खाडी, समुद्रकिनार्‍यामुळे खाडीक्षेत्र मोठे आहे. ठाणे जिल्ह्यातील खारफुटीचे मोठे क्षेत्र नाल्यातून, खाडीतून येणार्‍या कचर्‍यामुळे बाधित होत आहे. या कचर्‍यामुळे खारफुटीला धोका निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने चालू वर्षांत ठाणे जिह्यात सुमारे तीन लाख खारफुटींचे रोपण करण्याचे लक्ष्य आखले आहे. मात्र आहे त्या खारफुटीचे क्षेत्र कमी होत असताना ही खारफुटी वाचवण्यासाठी प्रयत्न तोकडे पडत आहेत. ठाणे आणि कळवा खाडी परिसर प्रचंड कचर्‍याने व्यापला आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामामुळे खारफुटी उद्धवस्त होत असताना कचर्‍यामुळे खारफुटीसमोर संकट उभे राहिले आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी या पट्ट्यात निवडक ठिकाणी खारफुटी शिल्लक आहे. तर दुसरीकडे खाडी, नाल्यातून वाहून आलेला आणि नागरिकांनी टाकलेल्या कचर्‍यामुळे खारफूटीचे क्षेत्र नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खारफुटी क्षेत्राचे जतन होणे गरजेचे

ठाणे जिल्हा आणि परिसरात खारफुटी नष्ट होत आहे. दुसरीकडे खाडीभागातील कचरा साफ करताना खारफुटीच्या मुळांना इजा न पोहोचवता हा कचरा काढणे आवश्यक आहे. शासनाने सुमारे 35 हेक्टर जागेवर खारफूटीची लागवड करण्याचे धोरण आखले आहे. मात्र नव्याने खारफुटी लागवड करण्याआधी आहे त्या खारफुटी क्षेत्राचे जतन होणे गरजेचे आहे.
-अरुण गुन्डे, राष्ट्रीय अध्यक्ष, एन्व्हॉयरमेन्ट पोल्युशन कन्ट्रोल अ‍ॅन्ड सेफ्टी फाऊन्डेशन

खारफुटीक्षेत्रातून आठ हजार टन कचरा काढला

वनविभागाच्या खारफुटी संवर्धन कक्षामार्फत खारफूटी क्षेत्रातील कचरा साफ करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. ज्यामध्ये मुंबई परिसरासह नवी मुंबईतील ऐरोली आणि वाशी तर भिवंडीतील अंजूर भागात या वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत राबवण्यात आलेल्या मोहिमेत आठ हजार टन कचरा काढण्यात आला. आता पावसाळ्यामुळे ही मोहिम स्थगित ठेवण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर ठाणे, कळवा खाडीत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
-एन. वासुदेवन, मुख्य वन संरक्षक, खारफुटी संवर्धन कक्ष