‘माकडं फक्त उड्या मारतात, काम करत नाहीत’, ठाणे महापौरांचा मनसेच्या जाधवांना टोला

Thane mayor Naresh mhaske and Avinash Jadhav
ठाणे मनपाचे महापौर नरेश म्हस्के आणि मनसे नेते अविनाश जाधव

आगामी ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेनेने जरी कंबर कसली असली, तरी त्याविरोधात ठाण्यात मनसेनं जोरदार आघाडी उघडली आहे. भाजप देखील विरोध तीव्र करत आहे. विशेषत: ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेनेला खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे शिवसेनेला यंदाचा महापालिकेचा पेपर कठीण जाईल असं बोललं जात असलं, तरी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना मात्र शिवसेनेच्या यशाची पक्की खात्री आहे. याच निवडणुकांसंदर्भात आणि मनसेच्या संभाव्य आव्हानासंदर्भात नरेश म्हस्केंनी माय महानगरच्या खुल्लम खुल्ला या कार्यक्रमात सविस्तर भूमिका मांडली.

नरेश म्हस्केंनी यावेळी बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला. ‘ज्या पक्षाचा एक नगरसेवकही निवडून येत नाही, अशा पक्षानं काय आमच्याविरोधात बोलावं. अविनाश जाधव नगरसेवक पदाची निवडणूकही हरले आहेत. रस्त्यावर उड्या मारणाऱ्या माकडाभोवती गर्दी जमते. पण ते माकड काम करू शकत नाही. फक्त उड्या मारू शकतं. ठाण्यात एकहाती शिवसेनेची सत्ता येते, याचा अर्थ लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आमच्या दृष्टीने मनसे नेते अविनाश जाधव मोठे नाहीत’, असं ते म्हणाले.

कोविड काळाच शिवसेनेचं चोख काम

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी कोविड काळात ठाणे महानगर पालिकेने आणि शिवसेनेने केलेल्या चोख कामाचा दावा केला. ‘कोविड काळात अतिशय चांगलं काम सुरुवातीच्या काळात झालं आहे. जगभरात हीच परिस्थिती होती. कुणालाच या आजाराचा अंदाज नव्हता. ठाणे मनपानं १००० बेडचं हॉस्पिटल उभं केलं. पण मनुष्यबळ पुरवणं कठीण काम होतं. म्हणून आम्ही ते हॉस्पिटल खासगी कंपनीला चालवायला दिलं. नर्सेस आम्ही कॉन्ट्रॅक्टवरच घेतल्या होत्या. त्या आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडे शिफ्ट केल्या. पण त्यावरूनही मोठा गोंधळ घातला गेला. अँटिजेन टेस्ट किटचा पुन्हा वापर करणं शक्यच नसतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण खोटे आरोप केले जात आहेत. एकनाथ शिंदेंविरुद्ध बोललं की प्रसिद्धी मिळते. मनसेचे कोणतेही कार्यकर्ते वॉर्डात काम करत नव्हते. फक्त अविनाश जाधव मीडियासमोर बोलतात’, असं ते म्हणाले.