घरठाणेठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची पोलीस गृहनिर्माण मंडळात व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची पोलीस गृहनिर्माण मंडळात व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

Subscribe

ठाणे पोलीस आयुक्तपदासाठी महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख जयजित सिंग, तसेच राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत बुरुडे यांची नावे चर्चेत आहेत.

राज्यातील ठाकरे सरकारने आज गृह खात्यातील तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची पदोन्नती करत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फणसाळकर यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या विशेष कृती अभियानाचे अप्पर पोलीस महासंचालक के. वेंकटेशन यांनाही पदोन्नती देत त्यांची बदली नियुक्ती नागरी संरक्षण दलाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. तर राज्याचे लोहमार्ग विभागाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांची न्यायिक आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची पदोन्नतीने जरी राज्याच्या पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असली तरी राज्य सरकारने अद्याप ठाण्यासाठी नवीन आयुक्त दिलेला नाही. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत ठाण्याचे सहपोलीस आयुक्त सुरेश कुमार मेकला यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार ठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करते याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

ठाणे पोलीस आयुक्तपदासाठी तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख जयजित सिंग, तसेच राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत बुरुडे यांचा समावेश आहे. मात्र, गृह खात्यातील सूत्रानुसार आता प्रशांत बुरुडे यांचे नाव काहीसे मागे पडल्याची चर्चा आहे.

ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्य सरकारने नागरी संरक्षण दलामध्ये संचालकपदी बदली केली होती. त्यानंतर त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर (सीआरपीएफ) निघून गेल्या. त्यामुळे हे पद रिक्त होते. त्याजागी आता राज्याच्या विशेष कृती अभियानाचे अपर पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर राज्याच्या न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक असलेले हेमंत नगराळे यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी करण्यात आल्याने हे पद देखील रिक्त झाले होते. त्या रिक्त पदावर १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संदीप बिश्नोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -