ठाणे । केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी रविवारी ठाण्यातील भाजप उमेदवार संजय केळकर आणि प्रताप सरनाईक यांच्या प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यापासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत आपली भूमिका मांडली, यावेळी त्यांनी रस्ते विकास, ऑटोमोबाईल उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, शेती अशा अनेक विषयांवर केंद्र सरकारच्या कामांची माहिती दिली. स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे आणि अशोक सिंघल यांना स्मृतीदिनी अभिवादन करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
ठाण्यातील प्रश्न वाहतूक कोंडी, प्रदुषणाचे तेच आहेत. मुंबई ठाण्यात उड्डाणपूल बांधल्यावरही वाहतूक कोंडी कमी झाली नाही. त्यासाठी शहराबाहेरील रस्ते बांधणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दिल्लीपासून मुंबईपर्यंत मोठा एक्सप्रेस हायवे बांधणार यासाठी १ लाख एक हजार ९२१ खर्च आहे, यातील ७० टक्के काम पूर्ण झाले. दिल्ली ते चेन्नई रस्त्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च होणार असून या रस्त्यांचा सर्वाधिक फायदा मुंबई पुणे ठाण्याला होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मुंबई ठाण्यात प्रदुषण आणि वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबई ते सूरत रस्त्यासाठी २६ हजार कोटींचा खर्च होणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसच्या रशियन मॉडेलमुळे विकासाला खीळ
साठ वर्षे काँग्रेसने राज्य केले. रशियाचे कम्युनिझमचे उद्योगविषयी मॉडेल पंडीत नेहरुंनी स्वीकारले त्यामुळे खाण आणि इतर प्रकल्पातील नियोजन चुकले आर्थिक धोरणाच्या चुकीच्या धोरणांमुळे मोठा तोटा झाला. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला महत्व दिले, ठाणे,मुंंबईला वाढायला जागा नाही. २२ लाख कोटींचे इंधन आपण आयात करतो त्यामुळे प्रदुषण वाढत आहे. हा पैसा वाचवण्यासाठी इंधनविरहित पर्याय शोधायला हवेत. देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त विकास झाला आहे. इंधनविरहित परिवहनचा विचार करण्यासाठी टोयाटोचा २० हजार कोटींचा प्रकल्प संभाजीनगरमध्ये होणार आहे, असे गडकरी म्हणाले.
सामाजिक विचारांचे मूळ महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही महाराष्ट्रात यावी ही बाळासाहेबांची इच्छा होती. तसेच विकासात २१ वे शतक भारताचे असणार आहे. काम करण्यासाठी पैशांची कमी नाही, मात्र इमानदार नेत्यांची गरज आहे. योग्य निती हवी. त्यामुळे ६० वर्षात जे काँग्रेसने केले नाही ते मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवले. इलेक्ट्रीक वाहनांना भारतात मोठा वाव आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत भारत जगात तिसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केबल कार, फेनाक्युलर रेल्वेचे प्रकल्प देशात होणार आहेत. देशात इलेक्ट्रीक कार, ट्रकही आले आहेत. हा उद्योग वाढत जाणार आहे.
बाबासाहेबांचे संविधान काँग्रेसनेच बदलले
मागील निवडणुकीत जातीय आणि सांपदायीक वादाचे विष कालवले गेले, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आम्ही बदलणार आहोत, असा चुकीचा प्रचार केला गेला, आम्ही संविधान बदलणार नाही, कोणाला बदलू देणार नाही. घटनेची मूलभूत तत्वे बदलता येणार नाहीत, मात्र ही तत्वे कोणी बदलली? इंदिरा गांधी रायबरेलीची निवडणूक जिंकल्या त्यावेळी अलाहबाद हायकोर्टात रिट पिटीशन झाली. हायकोर्टाने ही निवडणूक अवैध घोषित केली त्यानंतर त्यानंतर देशात आणीबाणी लागली, या आणीबाणीत बाबासाहेबांच्या संविधानाची लक्तरे काँग्रेसने काढली. स्वतःच्या स्वार्थासाठी संविधानात अनेक दुरुस्ती केल्या. त्यानंतर जनता पार्टीचं सरकार ७७ साली निवडून आले, त्यावेळी संविधानातील दुरुस्त्या रद्द केल्या. ज्या लोकांनी संविधान मोडले तेच लोक आता लोकांच्या मनात विष कालवत गावागावात फिरत आहेत. जातीयवाद आणि सांप्रदायिकेतेच राजकारण आपल्या देशाकरता उपयोगाचे नाही. निवडणुकीत जातीचा विचार नको. ठाणे जिल्ह्यात सर्वांगिण विकास व्हायला हवा. मी ठाण्यात काम करत होतो, त्यामुळे या शहराशी माझी ओळख असल्याचे गडकरी म्हणाले.