‘गाजर’ दाखवणाऱ्या अहंकारी राजाला शेतकरी-कष्टकऱ्यांनीच खुर्चीवरून खेचले, प्रविण दरेकरांचा ठाकरेंना टोला

pravin darekar

मुंबई : शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देण्याऐवजी गाजराकडे बोट दाखविणाऱ्या अहंकारी राजाला महाविकास आघाडीच्या खुर्चीवरून शेतकरी, वंचित, कष्टकऱ्यांनीच खुर्चीवरून पायउतार केले, असा घणाघाती टोला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना त्यांनी बजेटचे समर्थन करताना ही टीका केली. यावेळी त्यांनी अजित पवार, आदित्य ठाकरे यांनाही टिकेचे लक्ष्य केले.

अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाना आनंद देणारा असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. याचे केवळ सरकार म्हणून आम्हीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, अग्रलेखाच्या माध्यमातून एखाद दुसरे वर्तमानपत्र सोडले तर उत्तम अर्थसंकल्प असल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प जनभागीदारीचा आहे. राज्याच्या जवळपास आठवड्यात ४० हजार लोकांना विचारले की, आपला अर्थसंकल्प कसा असावा, त्यात काय समाविष्ट करावे आणि त्यातून तयार झालेला हा अर्थसंकल्प आहे. पाच ध्येय्यांवर आधारित ‘पंचामृत’ असा हा अर्थसंकल्प असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. यावेळी दरेकर यांनी अर्थसंकल्पाला ‘गाजर हलवा’ म्हटलेल्या विरोधकांवर चांगलीच तोफ डागली. तसेच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टिकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

दानवे यांच्या जत्रेच्या गोष्टीला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, आमच्याकडे कोकणात जत्रा असते. या जत्रेला आलेल्या लोकांना सांगितले की, बाहेर जाताना एक पॅसेज आहे तेथे गाजर तर लावलेय पण बाजूला एक खुर्ची ठेवलीय व त्या खुर्चीवर महाविकास आघाडी असे लिहिले आहे. तिथे जा त्या खुर्चीला जे काही गाऱ्हाणे असेल, प्रश्न असतील ते सांगा. तुम्हाला न्याय मिळेल. शेतकरी येतात. जत्रेतून देवाच्या पाया पडून जाताना त्या ठिकाणी जातात. खुर्चीवर राजा बसलेला असतो. शेतकऱ्यांना न्याय हवा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. राजा आपला ठप्प, बोलतच नाही. शेतकरी पुन्हा बोलतो, टाहो फोडतो. तुम्ही आम्हाला सांगितले न्याय देणार. राजा गाजराकडे बोट दाखवतो. शेतकऱ्याला काही कळत नाही. तो बाहेर जातो. दुसरा कष्टकरी कामगार येतो. खुर्चीला नमस्कार करतो आणि राजाला विचारतो आमच्या कष्टकरी, वंचिताचे प्रश्न आहेत राजा परत गाजराकडे बोट दाखवतो. असे करून जत्रेत भक्त, हिंदुत्ववादी विचाराचे लोकं आत येतात आणि जातात. न्याय मागतात की आमचे देव कड्याकुलपात आहेत काहीतरी करा राजे. राजा मात्र ठप्प, परत गाजर दाखवतो. लोकं बाहेर निघून जातात. शेवटी शेतकरी, कामगार राजाला धडा शिकवण्याचे ठरवतात. एवढ्यात तिथून एक घोळका येत असतो. त्यात एक दाढीवाले होते. ठाण्यातून एकनाथ शिंदे त्या जत्रेला गेले होते. तिकडे शिंदे आल्यावर सर्व शेतकरी जमा होतात. राजाने न्याय मागायला बोलावले पण आता ही खुर्ची हलवायला लागेल. आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला तो धाडसी व्यक्ती बोलला ठीक आहे. मग एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आत जातात. राजा खुर्चीवर बसलेला असतो. गदागदा खुर्ची हलवतात आणि त्या राजाला पायउतार करतात. एकनाथ शिंदे त्या खुर्चीवर बसतात. मग राजा खुर्ची गेल्याने अस्वस्थ, बेचैन होतो. त्याला ते गाजर दिसते. लोकं माझ्याकडे न्याय मागायला यायची मी त्यांना न्याय नाही द्यायचो उलट गाजर दाखवायचो. राजाच्या कानावर अजूनही ‘हलवा, हलवा, हलवा’ येतेय. एकनाथ शिंदे खुर्चीवर विराजमान होतात आणि देवेंद्र फडणवीस यांना अर्थमंत्री होऊन राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सांगतात. फडणवीस राज्याला उत्तम, सर्वसमावेशक अर्थसंकल्प देतात. त्यानंतर राजाकडे चॅनेल्सवाले जातात. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया मागतात. राजा म्हणतो अर्थसंकल्प गाजर हलवा वाटतो. कारण राजाच्या डोळ्यासमोर गाजर असते. ते काय त्याच्यासमोरून जात नाही, असेही दरेकर म्हणाले. तसेच आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो. या अर्थसंकल्पात पायाभूत, मूलभूत सुविधांवर भर देण्यात आल्याचे दरेकर यांनी विरोधकांना सुनावले.

दरेकर म्हणाले की, चांगल्याला चांगले म्हणणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. विरोधी पक्ष म्हणून टीका करा, जे चुकीचे असेल त्यावर आरोप-प्रत्यारोप करा तो लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे. पण ज्यावेळी अर्थमंत्री अतिशय मेहनत घेऊन, जनतेला सोबत घेऊन एखादा राज्याच्या हिताचा चांगला अर्थसंकल्प मांडतात त्यावर टीका करताना चांगल्या गोष्टीचे कौतुक करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. टीका करताना आपण किती डोळेझाक करायची याला मर्यादा असते. एका पक्षाच्या प्रमुखांनी अर्थसंकल्प म्हणजे समाजातील सर्व घटकांना मधाचे बोट दाखवण्याचा प्रयत्न अशा प्रकारची टीका केली. एका बाजूला समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा, राजे उमाजी नाईक रामोशी समाजासाठी, वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण महामंडळ, धनगर समाजासाठी १० हजार कोटी बिनव्याजी कर्ज आणि २२ वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. तरीही टीका करतात. यावेळी दरेकर यांनी महाबळेश्वर येथील मागर गावाचा उल्लेख करत तेथे शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती दिली आणि आम्ही मधाचे बोट नाही अख्खे गावच मधाचे करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे खडेबोलही दरेकरांनी विरोधकांना सुनावले.

पुढे बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचे आभार मानले. जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पात दोन गोष्टी चांगल्या झाल्याचे म्हटले आहे. एक म्हणजे केंद्र ज्याप्रमाणे सहा हजार रुपये देते त्याप्रमाणे राज्य सरकारही सहा हजार रुपये देणार आहे. हा शेतकरी हिताचा निर्णय नाही का? १ कोटी १५ लाख लोकांना याचा फायदा होणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. यावेळी दरेकर यांनी संत तुकाराम महाराज यांच्या ‘दैन्य दुःख आम्हां न येती जवळी! दहन हे होळी होती दोष!!’ या ओळी वाचून दाखवल्या.

दरेकर पुढे म्हणाले की, केंद्राने आम्हाला काही दिले नाही अशी टीका करायची. पण तुमचा अहंकार एवढा होता की केंद्राचा हिस्सा दिला नाही, योजनांचे पैसे वापरले नाही आणि उलट सांगता केंद्राने काही दिले नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हजारो कोटी रुपये केंद्राकडून महाराष्ट्राला मिळाले. साखर कारखाने अडचणीत होते, त्यावेळी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी मदत केली. तुम्ही शेतकरी बांधावर जाऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देणार असे सांगितले होते. प्रत्यक्षात दिलात का? फक्त घोषणा केलात. शिंदे-फडणवीस या आमच्या सरकारने ते पैसे दिले. सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारच्या माध्यमातून केले गेले. त्यामुळे उपेक्षित, वंचित समाज आज या अर्थसंकल्पावर अत्यंत समाधानी असल्याचेही दरेकर म्हणाले.

अजित पवार आणि आदित्य ठाकरेंनाही केले लक्ष्य
अर्थसंकल्पावर बोलताना दरेकर यांनी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले बजेट हे स्वप्नांचे इमले बांधणारे असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. स्प्नांचे इमले नाही, तर गोरगरिबांचे इमले उभारण्यासाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तीन वर्षात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दहा लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी १२ हजार कोटी रुपये दिले आहेत. हे स्वप्नांचे इमले आहेत का? सगळ्या समाजाला यात सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गरिबाला घर देण्याचे काम हे सरकार करत आहे. ज्येष्ठ नेत्यांचे मला आश्चर्य वाटते. ज्यांनी कधीकाळी बजेट मांडलेले आहे. ते शेती, उद्योग, रोजगार निर्मिती, गुंतवणूक यासाठी काहीच तरतूद केली नाही, असे कसे म्हणू शकतात. बजेट जर नीट पाहिले तर अशा सगळ्या गोष्टींची काळजी सरकारने घेतली आहे. तरी अजित पवार म्हणतात तरतूद केलेली नाही. झोपेचे सोंग, डोळ्यावर झापड असलेल्यांना काय कळणार. विरोधी पक्ष बेचैन आहे, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. १४ मार्चला काय निकाल येणार म्हणून अशा तरतुदी केल्या. निवडणूक जुमला अशी टीका अर्थसंकल्पावर करण्यात आली. अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत झाले ही यांची खरी पोटदुखी आहे. सणाला आनंदाचा शिधा दिला. सरकारच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे. गुढीपाडवा, आंबेडकर जयंतीला देखील आनंदाचा शिधा सरकारकडून दिला जाणार आहे. विमानतळासाठी केवळ घोषणा नाही, तर त्यासाठी तरतूद देखील केली आहे. तेव्हा टीका करण्याआधी विरोधकांनी अर्थसंकल्पातील तरतूदी एकदा बघितल्या पाहिजेत.
आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना दरेकर म्हणाले की, मुंबईसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या. मेट्रोची मोठी कामे मुंबईत होत आहे. त्याला गती देताना भरघोस निधी दिला. ८२० कामांची योजना सरकारने आणली. तुमच्या काळात केलेल्या घोषणांचे काय झाले? वनरुपी क्लिनिक तुम्ही सांगितले होते. वनरूपी क्लिनिक राज्यात कुठे झालेत का? कुठल्याही प्रकारचे काम तत्कालीन सरकारच्या माध्यमातून झाले नाही. गद्दारी, खंजीर खूपसणाऱ्यांवर विश्वास नाही बोलतात. फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात सरकार होते. त्यावेळी शिवसेना-भाजपला जनादेश दिला होता. गद्दारी कुणी केली. राष्ट्रवादी-काँग्रेससोबत कोण गेले? मग गद्दारी कोणी केली? असा सवाल देखील दरेकर यांनी केला. मुख्यमंत्र्यावर आरोप केले जातात, पक्ष चोरला, चिन्ह चोरले. पण तुम्ही गहाण ठेवलेला पक्ष, चिन्ह शिंदेंनी सोडवले. युवराजांनी सांगितले संत, धर्माबद्दल सरकारला बोलण्याचा अधिकार नाही. पण कोरोनात उत्सवांवर बंदी, मंदीर बंद ठेवण्याचे काम तुम्ही केली. तुमचा आता भ्रमनिरास झाला आहे. महापालिका कुणाची जहागीर नाही. २५ वर्षात आपण काय केले? याचा लेखाजोखा मांडा. फक्त डिपॉझीट वाढवले ते कशासाठी? लोकांच्या हितासाठी आता आम्ही तो वापरणार आहोत. मुंबईच्या सुशोभिकरणावर १ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या बजेटवर राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा प्रभाव होता. म्हणून ४० आमदारांनी उठाव केला. गद्दारी नाही, त्यांनी खुद्दारी केली. म्हणून त्यांच्या मतदारसंघात निधी मिळाला आहे, असा सणसणीत टोला देखील दरेकरांनी लगावला.

राज्यातील नागरी सहकारी बँका डबघाईला
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, आज आपण समाजातील सर्व घटकांना उर्जीतावस्था देण्याचे काम आम्ही करत आहोत. परंतु महाराष्ट्रातील सहकारी बँकांसमोर एक संकट आहे. राज्यात जवळपास पाचशेच्या आसपास नागरी सहकारी बँका आहेत. त्यातील २००-२५० च्या आसपास नागरी सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत. त्यांनी काही घोटाळे केले नाहीत. परंतु नाबार्ड आणि आरबीआयच्या निर्बंधामुळे त्यांना अनेक निर्बंध आलेत. व्यवसाय करायला दिला जात नाही. त्यामुळे संस्थेची प्रगती होत नाही. त्या संस्था बंद पडण्याच्या मार्गांवर आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने सहकार चळवळीला आधार देण्याचे काम केले आहे. मी त्यांचा आभारी आहे. शासनाने शंभर कोटी रुपये भागभांडवली सहकारी बँकांना उपलब्ध करून द्यावे. आम्हाला तुमचे पैसे नको. आम्ही जिल्हा, राज्य सहकारी बँका काही निधी उभा करू. ज्यावेळेला नागरी अर्बन बँका अडचणीत येतील त्यावेळेला त्यांना मदतीचा हात या व्यवस्थेच्या माध्यमातून झाला तर सर्वसामान्य माणसांना ज्या नागरी सहकारी बँका मदत करतात त्या बुडणार नाही. त्यांची काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. या बँकांसाठी हातभार लावणारी एखादी योजना सरकारच्या माध्यमातून व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी दरेकर यांनी व्यक्त केली.