घरमुंबईअंध-बहिर्‍या विद्यार्थिनींनी लिहिला दहावीचा पेपर

अंध-बहिर्‍या विद्यार्थिनींनी लिहिला दहावीचा पेपर

Subscribe

बोर्डाकडून टॅक्टीकल साईन लँग्वेज (स्पर्शज्ञान) जाणणार्‍या शिक्षकांची दिली मदत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला (दहावी) शुक्रवारपासून सुरुवात झाली. दहावीच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यामध्ये काही अडचणी असल्यास त्यांच्यासाठी बोर्डाकडून लेखनिक किंवा संवादक देण्यात येतो, परंतु यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसलेल्या दोन अंशत: अंध-बहिर्‍या मुलींना बोर्डाकडून टॅक्टीकल साईन लँग्वेजचे शिक्षक दिले आहेत. या मदतनीसाच्या मदतीने काजल व कृतिकाने शुक्रवारी घणसोली येथील परीक्षा केंद्रावर पेपर दिल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली.

नवी मुंबईतील हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डिफ अ‍ॅण्ड डिफ ब्लाईंडमधील काजल मांढरे व कृतिका मेहता या दोन मुली परीक्षेला बसल्या आहेत. दोन्ही मुली पुण्याच्या असून, त्यांचे शिक्षण हेलन केलर संस्थेमध्ये होत आहे. काजल व कृतिका बहिर्‍या असून, अंशत: अंध आहेत. त्यांना सर्वसाधारण अक्षरांपेक्षा तिप्पट मोठी अक्षरे दिसतात. त्यामुळे दोन्ही विद्यार्थिनींना मॅग्निफाईड पेपर देण्यात यावा, अशी मागणी इन्स्टिट्यूटकडून करण्यात आली होती, परंतु बोर्डाकडे तशी कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना मॅग्निफाईंड पेपर देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले, तसेच काजल आणि कृतिका दोघीही अंशत: अंध असण्याबरोबरच बहिर्‍या असल्याने त्यांना सर्वसाधारण मदतनीसाने प्रश्न वाचून सांगितल्यास त्यांना ऐकायलाही जाणार नाही. त्यामुळे टॅक्टीकल साईन लँग्वेजचे (स्पर्शज्ञान) ज्ञान असलेली व्यक्ती मदतनीस असणे आवश्यक होते. त्यामुळे काजल व कृतिकाच्या दोन शिक्षिकांनाच मदतनीस म्हणून मंजुरी दिल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

काजलला ऐशर सिंड्रोम हा आजार असल्याने तिला दिसत नाही. तर कृतिकाला जन्मत:च विविध व्यंग असल्याने तिची दृष्टी गेली होती, परंतु नुकतेच तिच्या एका डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्याने तिला काही अंशी दिसू लागले आहे. दोन्ही मुली या सर्वसाधारण अक्षरांपेक्षा तीनपट अधिक मोठे पाहू शकतात. त्यामुळे त्यांना स्पर्शज्ञानाची माहिती असलेला मदतनीस उपलब्ध केले. त्यांना प्रत्येक प्रश्न स्पर्शज्ञानाद्वारे सांगण्यात येतो त्यानुसार काजल व कृतिका स्वत: उत्तर लिहीत असल्याचे शिक्षिका पल्लवी रणपिसे यांनी सांगितले. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार या दोघींना काही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असल्याने त्यांनी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रोडक्ट, मॅथेमॅटिक्स, मराठी असे विषय निवडले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रत्येक इयत्तेचा अभ्यास तीन वर्षे शिकावा लागतो, असे शिक्षिका वनिता मस्डेकर यांनी सांगितले.हातावर शस्त्रक्रिया होऊनही देणार पेपर

ठाणे येथील सुभाष नगरमध्ये रहायला असलेला विशाल मोर्या हा माजिवाडामधील होम अफेअर इंग्लिश स्कूलमधून शिक्षण घेत आहे. परीक्षेच्या अभ्यासादरम्यान त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनी व मधल्या बोटाला काही दिवसांपूर्वी अचानक सूज आली. विशालचे वडील भरत यांनी त्याला ऑर्थोकेअर हॉस्पिटलमध्ये नेले असता विविध चाचण्यांनंतर विशालच्या बोटाला काहीतरी लागल्याने त्याचा हात सुजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भरतच्या हातामध्ये पू झाला असून, तातडीने शस्त्रक्रियेची गरज आहे. शस्त्रक्रिया न केल्यास विशालची तर्जनी कापावी लागण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. त्यामुळे विशालच्या हातावर गुरुवारी तातडीने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला तीन ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यास सांगितले, परंतु दहावीचा पेपर द्यायचा असल्याचे सांगत विशालने घरी जाण्याची परवानगी घेतली. त्यामुळे शुक्रवारी विशाल, त्याचे वडील भरत व शाळेच्या शिक्षिकेने बोर्डाकडे धाव घेऊन विशालला लेखनिक देण्याची मागणी केली. विशालची मागणी मान्य करत बोर्डाकडून त्याला लेखनिक देण्यात आला. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणार्‍या इंग्रजी माध्यमाचा पहिला पेपर विशालला देता येणार आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना पेपर सोपा
बदललेला अभ्यासक्रम, 80 मार्कांची लेखी व 20 मार्कांची तोंडी परीक्षा हा पॅटर्न बदलून संपूर्ण 100 मार्कांचा केलेला पेपर पॅटर्न यामुळे दहावीचा पेपर कसा असेल अशी चिंता परीक्षेला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात होती. शुक्रवारी पहिला पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर झालेली पहायला मिळाली. इतकेच नव्हे तर शाळेत घेतलेल्या प्रिलियमपेक्षा बोर्डाची परीक्षा अधिक सोपी होती, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षण मंडळाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी अर्धा तास लवकर आले होते. त्यांना ऑल द बेस्ट करण्यासाठी त्यांचे पालकही सोबत होते. परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मनावर असलेला ताण कमी करण्यासाठी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, पेन देऊन स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण हलका होण्यास मदत झाल्याचे पहायला मिळाले.

राज्यात 111 कॉपीची प्रकरणे
विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी बोर्डाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतात, परंतु दहावीच्या पहिल्याच दिवशी परीक्षेला राज्यात 111 जणांना कॉपी करताना पकडण्यात आले. यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक 71 प्रकरणे असून, त्याखालोखाल औरंगाबाद 21, नागपूर 12, अमरावती 4, पुणे 2, कोल्हापूरमध्ये एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडण्यात आलेे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -