पत्नीच्या धाडसी निर्णयाने वाचले चौघांचे प्राण

नवी मुंबईतील एका वृद्धेने आपल्या ब्रेनडेड झालेल्या पतीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे.

three people organs donated a one week in mumbai

आयुष्याच्या शेवटच्या वाटेवर वाटचाल करत असताना आपल्या जोडीदाराची साथ सुटल्याचं दु:ख न पेलवणारं असतं. पण, आपलं हे दु:ख बाजूला सारत एका ज्येष्ठ महिलेने आपल्या पतीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे चौघांना जीवदान मिळालं आहे. यावेळी ज्येष्ठ महिलेच्या पतीचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले.

बाळाराम भोईर यांना डॉक्टर्सने ब्रेनडेड घोषित केले

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात राहणारे ६१ वर्षीय बाळाराम भोईर (नाव बदलले आहे) यांच्या दुचाकीला २४ जुलै रोजी अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांनी तातडीने त्यांना वाशीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण, मेंदूत अतिरक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान ब्रेनडेड घोषित केलं. हॉस्पिटलच्या अवयवदान समन्वयकांनी बाळाराम यांच्या नातेवाईकांकडून अवयवदान करण्याची परवानगी मागितली. बाळाराम यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने चार गरजूंना नव्याने जीवदान मिळण्यास मदत झाली.

अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार

नवी मुंबईतील वाशीच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी हे अवयवदान करण्यात आलं. वाशीच्या एमजीएम हॉस्पिटलचे
झेडटीसीसी समन्वयक वैभव भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘अपघातानंतर रूग्णाला बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. डोक्याला दुखापत झाल्यानंतर गोल्डन अवर्समध्ये उपचार होणं गरजेचं होतं. त्यानुसार, तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले. पण, मेंदूत रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं आणि नातेवाईकांकडून अवयवदान करण्याची परवानगी मागितली. कुटुंबीय अवयवदानासंदर्भात जागृत असून त्यांच्या पत्नीने स्वतःहून पुढाकार घेत अवयवदान करण्यास परवानगी दिली.’’ त्यांच्या पत्नीच्या परवानगीनुसार बाळाराम भोईर यांचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले आहेत. या अवयवदानामुळे या पत्नीनं समाजात नवा आदर्श घालून दिला आहे. मुंबईत हे यावर्षीचं ५१वं अवयवदान ठरलं आहे.