घरमुंबईपालिकेच्या विद्यार्थी शिक्षकांवर परीक्षांचे ओझे

पालिकेच्या विद्यार्थी शिक्षकांवर परीक्षांचे ओझे

Subscribe
विद्यार्थ्यांवरील परीक्षांचे ओझे कमी करण्यासाठी एकीकडे केंद्र सरकार प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेचे विद्यार्थी नव्हे तर शिक्षक देखील परीक्षांच्या ओझ्याखाली दबल्याची धक्कादायक माहिती प्रकाशात आली आहे. अगोदरच्या शालेय विद्यार्थी मूल्यपामन परीक्षा, सत्र परीक्षा आणि सराव परीक्षेत आता ‘अध्ययन निष्पत्ती’ या परीक्षेची भर पडली आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) च्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांची आता प्रतिमहिना नवी लेखी परीक्षा होणार आहे.
या अगोदर यासाठी तोंडी परीक्षा घेतली जात असताना यंदापासून लेखी परीक्षांचा घाट पालिका प्रशासनाने घातल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर परीक्षांचे ओझे डोईजड होणार असल्याची टीका करण्यात येत आहे. तर या परीक्षांच्या नियोजनात पालिका प्रशासन नापास ठरले असून अनेक प्रश्नपत्रिका शनिवारपर्यंत शाळांकडे पोहचल्याच नसल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांच्या शाळा १०० टक्के प्रगत होण्यासाठी अध्ययन निष्पत्तीच्या परीक्षांचा नवा घाट घातला असून ही परीक्षा सध्या वादाच्या भोवर्यात अडकली आहे. एकाच दिवशी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या चार विषयांच्या परीक्षा घेण्याची वेळ शिक्षकांवर आली असून या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची तपासणी करुन त्याच दिवशी पोर्टलवर त्याचे गुण भरण्याची सक्तीच प्रशासनाने केल्याने शिक्षकांसह मुख्याध्यापकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.
या परीक्षेसाठी शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसल्याने शिक्षकांची पंचाईत झाली आहे. तर प्रशासनाने या उत्तरपत्रिका शाळांना मेलवर पाठविली असल्याने त्याच्या छपाई करण्याचा खर्चही शाळांना त्यांच्या खिशातून करावे लागणार असल्याने शाळांसमोर आर्थिक गणित सोडविण्याची नवी परीक्षा संस्थाचालकांना द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे लेखन आणि वाचनाचे मूल्यमापन करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला ही परीक्षा घ्यावयाची आहे. यंदा ही परीक्षा सोमवारी ८ ऑक्टोबर रोजी होणार असून पालिकेने त्यांच्या अंतर्गत सर्व केंद्र शाळांना प्रश्नपत्रिकांचे वाटप मेलवर केले आहे. केंद्र शाळांनी त्यांच्या अंतर्गत येणार्‍या शाळांना मेलवर तर काही शाळांना व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठविल्या आहेत. त्यामुळे परीक्षांचे नियोजन करताना शाळांनाही तारेवरची कसरत करावी लागणार असून या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स छपाई किंवा लेखन करावयाचे कधी, असा मोठा प्रश्नचिन्हच शाळांसमोर निर्माण झाला आहे.
पालिकेने शाळांना या सर्व उत्तरपत्रिका फळ्यावर लिहून देण्याची सूचना केली आहे. पण प्रत्यक्षात चार विषयांच्या उत्तरपत्रिका फळावर लिहून देताना शिक्षकांची दमछाक होणार आहे. त्यामुळे अनेक शाळांनी या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना झेरॉक्स काढून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा खर्च आता शाळांच्या बजेटवर बसणार आहे. तर या परीक्षेच्या उत्तरपत्रिका त्याच दिवशी तपासण्याची सक्तीही पालिकेने केली असून त्यांचे गुण त्याच दिवशी www.eshala. weebly.com या ऑनलाइन वेबसाईटवर सादर केली आहे. पालिकेने दिलेल्या सूचनेनुसार दर महिन्याच्या एक तारखेला या परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या महिन्यांनत फक्त ८ तारखेला ही परीक्षा होणार आहे.

निकाल उंचावण्यास मदत

राष्ट्रीय संपादणूक परीक्षा (नॅस)च्या मूल्यांकनात महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत मागे असल्याचे गेल्यावर्षी समोर आले आहे. त्यामुळे यात सुधारणा करण्यासाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित सराव परीक्षा घेतल्यास निकालात वाढ होईल. त्यामुळे प्रत्येक महिन्यात ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार विषयांच्या या परीक्षेत उपाययोजनात्मक आणि ज्ञानात्मक प्रश्नांचा समावेश आहे. त्यामुळे या परीक्षेचे ओझे असणार नाही. काही शिक्षक जाणीवपूर्वक त्याचा बाऊ करतायत.
-महेश पालकर, शिक्षणाधिकारी 

मुख्याध्यापकांचे मोबाईल हँग

सोमवारी पालिका शिक्षण विभागातर्फे केंद्र शाळांकडे या परीक्षेच्या उत्तरपत्रिका मेलवरुन पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतर केंद्र शाळांकडून या प्रश्नपत्रिका पुढे शाळांना पाठविण्यात आल्या आहेत. पहिली ते आठवीच्या चार विषयांच्या उत्तरपत्रिका मुख्याध्यापकांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर सर्व माध्यमाच्या प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्या माध्यमाच्या उत्तरपत्रिका शोधताना शिक्षकांना बरीच मशगत करावी लागत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचे मोबाईल हँग झाल्याची माहिती अनेक मुख्याध्यापकांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितली.

शिकवायचे कधी

मुंबई महानगरपलिकेने नव्याने घातलेल्या या परीक्षेचा घाट लक्षात घेता शिक्षकांमध्ये एकच नाराजी पसरली आहे. एकीकडे मूल्यमापन चाचणी, सराव परीक्षा, अध्ययन निष्पती तोंडी परीक्षा आणि आता अध्ययन निष्पत्ती मुख्य परीक्षा प्रत्येक महिन्याला घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. परीक्षांचे सत्र आणि वाढता अशैक्षणिक कामांचा बोजा वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, असा संतप्त सवाल यावेळी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -