तीस वर्ष रखडलेला शहर विकास आराखडा लवकरच मार्गी लागणार

नवी मुंबई : १ जानेवारी १९९२ रोजी स्थापन झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या विकास योजनेला ३० वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शहर विकास आराखडयाचा प्रश्न आता पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कारकिर्दीत मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने येत्या १४ मार्चपासून नमुंमपा प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त सूचना आणि हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी कार्यक्रम जाहीर केला आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १४ ते १६ आणि २३ ते २९ मार्च २०२३ या कालावधीत ही सुनावणी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, सेक्टर १५-ए, सीबीडी बेलापूर येथे होणार आहे.ॉ

नवी मुंबई महानगरपालिकेची प्रारूप विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २६ (१) अन्वये १० ऑगस्ट २०२२ रोजी सूचना व हरकती मागविणेकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर सूचना व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती. या कालावधीमध्ये प्राप्त १५८९२ सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यावर पालिकेकडून विभागवार दिनांकानुसार सुनावणी होणार आहे.

सर्व सूचना, हरकत धारकांना पालिकेच्यावतीने सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी पत्त्यानुसार विभागनिहाय नोटीस क्रमांकासह पत्र दिले आहे. ज्यांना नोटीसीची प्रत मिळालेली नसेल त्यांना विभाग कार्यालय तसेच मुख्यालयातील नगररचना विभागातील सुविधा केंद्रामधून घेणार आहे, असे पालिकेने कळविले आहे.

नियोजन समिती गठीत
नवी मुंबई महापालिकेला प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना प्रस्तावित महापालिका स्तरावर नियोजन समिती गठीत करण्याचे काम देखील पुर्ण झाले आहे. विकास आराखडयातील सूचना, हरकती धारकांना उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) अन्वये गठीत करण्यात आलेल्या समितीची प्राथमिक बैठक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडली. त्यानुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

विभागवार वेळापत्रक
ऐरोली १४ मार्च रोजी सकाळी ९ ते १० आणि ११ ते दुपारी १, बेलापूर-१४ मार्च रोजी दुपारी २ ते ३ आणि ३ ते ६, घणसोली १५ मार्च सकाळी ९ ते दुपारी ३, कोपरखैरणे १५ मार्च दुपारी दोन ते तीन आणि १६ मार्च सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत, वाशी १६ मार्च दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत, तुर्भे २३ मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी १ पर्यंत, सानपाडा २३ मार्च दुपारी २ ते ३.३०, सानपाडा २४ मार्च सकाळी ९ ते ११ पर्यंत, नेरूळ २४ मार्च सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत, नेरुळ-२७ मार्च रोजी सकाळी ११ ते १ पर्यंत, संपूर्ण नवी मुंबई क्षेत्राकरिता २७ मार्च रोजी दुपारी २ ते ६, विशेष स्वरूपाच्या हरकती २८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत आणि सिडको व इतर सुनावणी नोटिसांना २८ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ तर २९ आर्च रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

मेरीट व हरकतींच्या सुनावणीचा अहवाल शासनाकडे पाठवणार – राजेश नार्वेकर
नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. हरकती सुनावणींची प्रत्यक्षात प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यातील अर्जांची सत्यता पडताळली जाईल. त्यानंतर मेरीट व हरकतींच्या सुनावणीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल.