घरमुंबई‘मतदार दिना’चा वर्ग भरलाच नाही

‘मतदार दिना’चा वर्ग भरलाच नाही

Subscribe

राज्यातील सर्व शाळांना शिक्षण आयुक्तालयाकडून 25 जानेवारीला मतदार दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु प्रजासत्ताक दिनाची तयारी, दहावीची पूर्व परीक्षा व थोरांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त वारंवार शाळेत होणार्‍या कार्यक्रमामुळे अनेक शाळांमध्ये ‘मतदार दिना’कडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये फक्त फलक लेखनापुरताच दिन साजरा करण्यात आल्याने शुक्रवारी ‘मतदार दिना’चा वर्गच भरला नाही.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये वादविवाद स्पर्धा, प्रारुप मतदान, चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धा घेऊन लोकशाही व मतदारांचा सहभाग याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी हे प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ‘मतदार दिना’च्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये परेड, लेझिम, भाषण व वक्तृत्त्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना मतदार दिनानिमित्तचे कार्यक्रम करणे शक्य झाले नसल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले. तसेच अनेक शाळांमध्ये दहावीची पूर्व परीक्षा सुरू आहे. ही पूर्व परीक्षा 28 जानेवारीला संपणार आहे.

- Advertisement -

प्रजासत्ताक दिन व दहावीची पूर्व परीक्षा यामुळे शाळांमध्ये ‘मतदार दिन’ साजरा करण्यात आला नाही. परीक्षा सुरू असल्यावर शाळांकडून कार्यक्रम घेण्याचे टाळले जाते. त्यामुळे अनेक शाळांमध्ये दहावीचे विद्यार्थी पेपर देऊन घरी गेल्यानंतर दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना एकत्र करून थोडीशी माहिती व फलक लेखन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याचे शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांऐवजी पालकांमध्ये जागरूकता व्हावी

- Advertisement -

शाळेतील मुलांना मतदानाचा अधिकार नसतो. तसेच मतदानावेळी त्यांना मतदान केंद्रावरही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे त्यांना मतदान करण्यासंदर्भात शपथ का म्हणून द्यावी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांना नागरिक शास्त्र विषयातून मतदान व निवडणूक प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती देण्यात येते. त्यामुळे लहान वयात त्यांना विद्यार्थ्यांना इतकी माहिती पुरेशी असते. परंतु विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता करण्याचा प्रयत्न असला तरी विद्यार्थ्यांऐवजी शाळांमध्ये पालकांसाठी विशिष्ट वर्ग भरवल्यास त्यांच्यामध्ये जागरुकता करणे सोपे होईल.– राजेश पंड्या,उपाध्यक्ष, टीचर्स डेमोक्रेटीक फ्रंट

….तर दिवस कागदावरच राहिल

मतदार दिन साजरा करण्याचे नुसते आदेश काढून काहीही होणार नाही. त्यामुळे मतदार दिवस कागदावरच राहिल. मतदान दिन चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर निवडणूक अधिकार्‍यांनी स्वत: शाळांमध्ये जाऊन भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यास प्रचार होईल.– प्रशांत रेडीज,सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -