घरमुंबईकाँग्रेस कार्यकर्त्याची हत्या बॅनर लावण्याच्या वादातूनच

काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या बॅनर लावण्याच्या वादातूनच

Subscribe

मुंबईतील असल्फा परिसरात राहणार्‍या काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची तलवारीचे वार करून हत्या करण्यात आली होती. फेसबुकवर झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे म्हटले जात होते, मात्र या हत्येस कारण ठरलेला अजून एक वाद आता समोर आला आहे. हत्या झालेल्या संध्याकाळीच मृत मनोज दुबे आणि आरोपी उमेश सिंग यांच्यात बॅनर लावण्याच्या जागेवरून भांडण झाले होते. या भांडणादरम्यान रागाच्या भरात मनोज दुबे याने उमेश सिंगच्या कानाखाली वाजवली होती. हाच राग उमेश सिंगच्या मनात खदखदत होता. या रागातूनच ही हत्या करण्यात आल्याची माहिती आता मिळत आहे. रविवारी रात्री उशीरा यासंदर्भात उमेश सिंग आणि जितेंद्र मिश्रा या दोघांना अटक करण्यात आली.

असल्फा परिसरातील माहेश्वर मंदिरानजीक बॅनर लावण्याच्या जागेवरून हा वाद झाला. मनोज दुबे काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने त्या जागी काँग्रेस पक्षाचाच बॅनर लागावा असे त्याचे म्हणणे होते. तर, उमेश सिंग आणि जितेंद्र मिश्रा हे भाजपचे असल्याने त्या जागी भाजपचा बॅनर लागावा अशी मागणी केली होती. यावरुन गेले काही दिवस सतत त्यांच्यात खटके उडत होते. शिवाय फेसबुकवर पक्षाशी निगडीत असणार्‍या पोस्टवरदेखील कमेंटवॉर होत होते अशी माहिती पोलिसाकडून मिळाली आहे. मनोज दुबे दोन वर्षापूर्वी रिक्षा चालवत होता, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करायला लागल्यानंतर त्याने हे काम सोडून दिले होते.

- Advertisement -

चांदिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नसीम खान यांच्याशी दुबेचे चांगले लागबंधे होते. त्यांच्यासोबतचे फोटोसुद्धा दुबेकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. काँग्रेस आणि भाजपाशी निगडीत असणार्‍या पोस्ट फेसबुकवर टाकण्यावरुन त्यांच्यात स्पर्धा चालू होती. या सगळ्या गोष्टींवरूनच वाद झाल्यानंतर रागाच्या भरात दुबेने उमेशला कानशिलात लगावली. यानंतर रागाच्या भरात उमेश सिंग निघून गेला. तर त्याच वेळी मनोज दुबे याने फेसबुकवर २०१९ साली काँग्रेस पक्षाची सत्ता येईल अशी पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर भाजप कार्यकर्त्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. हळूहळू हे भांडण वाढत गेले आणि यानंतर याचे रुपांतर गंभीर भांडणात झाले.

काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांवरसुद्धा या पोस्टवरुन नावे ठेवण्यात आली असल्याची माहिती साकीनाका पोलीसांनी दिली आहे. या सर्व प्रकारानंतर रात्री दीडच्या सुमारास मनोज दुबेला असल्फा मेट्रो स्थानकाच्या खाली अडवून त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले. उपचारासाठी दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी,वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत,पोलीस निरीक्षक सुनिल माने आणि साकीनाका पोलीस ठाण्याचे पथक यासंदर्भात अधिक तपास करत आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशात पळून जाणार होते

घाटकोपर येथे काँग्रेस कार्यकर्त्या हत्येप्रकरणी दोन संशयित आरोपींना जळगाव येथील भुसावळ परिसरातून साकिनाका पोलिसांच्या अधिकार्‍यांनी अटक केली. जितेंद्र मिश्रा आणि उमेश सिंग अशी या दोघांची नावे आहेत. यातील जितेंद्र मिश्रा हा सिव्हिल कॉन्ट्रक्टर तर उमेश सिंग हा भाजपा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोज दुबे यांच्या हत्येनंतर ते दोघेही उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 30 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -