Coronavirus : कोरोनाग्रस्त रुग्णावर डोंबिवलीतच उपचार होणार!

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने डोंबिवलीतील न्यूऑन या खाजगी रुग्णालयाबरोबर करारनामा केला.

Eknath Shinde in KDMC
कल्याण डोंबिवलीत कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे त्याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने डोंबिवलीतील न्यूऑन या खाजगी रुग्णालयाबरोबर करारनामा केला असून, या रुग्णालयात करोना रुग्णावर उपचार सुरु केले जातील, अशी माहिती शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आणि जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालिका मुख्यालयात आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतला .
कल्याण डोंबिवलीतील करोना रुग्णाचा आकडा वाढत असून या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा आणि स्वच्छता फवारणीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ,पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार गणपत गायकवाड  यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकरी उपस्थित होते .
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री शिंदे यांनी  आरोग्य सेवेबरोबरच स्वच्छतेसाठी आणि सुरक्षेसाठी लागणारी उपकरणे आणि औषधे खरेदी करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले असून कशाचीही कमतरता पडू देणार नसल्याचे सांगितले.
संशयित रुग्णांना होम कवारटाइन आणि इन्स्टिट्यूशन क्वारटाइन केले जात असून डोंबिवलीतील न्यूऑन रुग्णालयाच्या  मालकाने पालिकेबरोबर करार करून हे रुग्णालय करोनासाठी दिले आहे. यामुळे संशयित आणि पोझीटिव्ह रुग्णांना या रुग्णालयात ठेवले जाईल. तर कमी लक्षणे असलेल्याना शास्त्रीनगर रुग्णालयात ठेवले जाणार आहे. आतापर्यत संशयित रुग्णांना थेट कस्तुरबा मध्ये धाडले जात होते मात्र आता शनिवार पासून शहरात सापडणार्या रुग्णाचे स्वब तपासणीसाठी पाठवले जातील आणि या रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार केले जातील भविष्यात रुग्ण वाढले तर डोंबिवली मधील आर आर हॉस्पिटल देखील ताब्यात घेतले जाईल. १० रुग्णवाहिका सज्ज असून, कार्डीयाक रुग्णवाहिकेची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांककडून केली जाईल. तर रूग्णालया बरोबरच स्वच्छता आणि फवारणी कर्मचाऱ्याना वैयक्तिक सुरक्षेचे पी पी कीट, मास्क, फवारणी सोल्युशन कमी पडणार नाही.
आय एमए बरोबरच खाजगी रुग्णालयातील टीमला अत्यावश्यक कामात सामावून घेतले जाणार असून खाजगी रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  परिवहन सेवा आणखी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून. लोकप्रतिनिधी आणि  प्रशासनाने एकत्र टीम म्हून काम करावे असे सुचवितानाच त्यांनी  राज्य शासन, केंद्र शासनाचे निर्णय पाळा, नागरिकाच्या आरोग्यासाठी या उपाय योजना असून नागरिकांनी सहकार्य करा, ज्यामुळे करोनाला हरवू शकतो. नागरिकांनी स्वताहून पुढे येत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान हळदी आणि लग्न समारभामुळेच करोना रुग्णाची संख्या वाढली असून यात  सहभागी झालेल्याची चौकशी नक्की होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.