घरमुंबईनामपाडा धरणाचा खर्च चारपटीने वाढला

नामपाडा धरणाचा खर्च चारपटीने वाढला

Subscribe

लालफितीच्या कारभाराचा फटका शेतकर्‍यांना

गेल्या दहा वर्षांपासून सरकारी लालफितीच्या कारभारामुळे रखडलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नामपाडा धरणाची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. या धरणाचा सरकारी अंदाजपत्रकीय खर्च 9 कोटींवरून 39 कोटींवर पोहचल्याची माहिती आहे. या धरणासाठी केवळ सरकारी खर्च वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र हे धरण आजही अपूर्ण अवस्थेतच असल्याने शेतकर्‍यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे .

शहापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर किन्हवलीजवळ नामपाडा नावाचा धरण प्रकल्प राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने 2009 सालापासून हाती घेतला आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या ऐन निवडणुकांच्या तोंडावर या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. सुरुवातीला कासवाच्या गतीने सुरू असलेले धरणाचे काम वर्षभरातच रखडून पडले. संपूर्ण मातीचे काम असलेल्या या धरणाला केवळ स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून जलसंपदा विभागाने मान्यता दिली होती, परंतु वन विभागाच्या परवानग्या अपूर्ण राहिल्याने वन विभागाने हे काम बंद पाडले होते. आजमितीस या धरणाचे फक्त 30 टक्केच काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण 3 हजार 533 दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

- Advertisement -

हे धरण पूर्ण झाल्यास धरणाच्या डाव्या कालव्यातून 255 हेक्टर क्षेत्रात सिंचन होणार आहे. सुरुवातीला 9 कोटी 15 लाख रुपये खर्च असलेल्या नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च जलसंपदा विभागाच्या सुधारित अंदाज पत्रकानुसार 39 कोटी असा चौपट झाला आहे. या वाढीव खर्चाचे हे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा विभागात पाठविण्यात आल्याचे जलसंपदा विभागाच्या नामपाडा सिंचन प्रकल्पाचे प्रभारी उपविभागीय अभियंता एस. आर. दांडकर यांनी सांगितले. नामपाडा धरणास वन विभागाची तत्वतः मान्यता मिळाली असून अंतिम मान्यतेची प्रतिक्षा आहे. अशी माहिती उपअभियंता दांडकर यांनी दिली.

नामपाडा धरणाकरीत वनविभागाच्या 38 हेक्टर जागेची आवश्यकता आहे .या जागेच्या मोबदल्यात वनविभागाला 5 कोटी 35 लाख रुपये जलसंपदा विभागाने दिले आहेत. तर 38 हेक्टर पर्यायी जागा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साजे येथे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका वैजापूर वाकेलेगाव येथे देण्यात आल्याचे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -