घरमुंबईमहापालिकेचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक आयात

महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक आयात

Subscribe

कायमस्वरुपी संचालक नेमण्यास लायक अधिकारी नाही का?

सुमारे तीस हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान (आय टी) विभागाला कायमस्वरुपी संचालक मिळेनासा झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालकपद कंत्राटी पध्दतीने बाहेरुन भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापलिकेने जाहिरात दिली आहे. परंतु, मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना, बाहेरच्या व्यक्तीला आयटी विभागाचे प्रमुख म्हणून नेमण्याची पुन्हा वेळ आली. बाहेरच्या व्यक्तीच्या हातात महापालिकेच्या आयटी विभागाची पुन्हा दोरी जाणार असून या पदावर कायमस्वरुपी अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेत एकही लायक अधिकारी नसल्याचे दाखवून दिले आहे.

मुंबई महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी)विभागाच्या संचालकपदासाठी जाहिरात देण्यात आली असून खासगी क्षेत्रातील अनुभवानुसार हे पद भरले जाणार आहे. तत्कालिन सहआयुक्त डॉ. सतीश भिडे व अतिरिक्त श्रीकांत सिंह आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी यापूर्वी आयटी विभागाचा भार समर्थपणे उचलला होता. मात्र,त्यानंतर या विभागाचा कारभार विस्कळीतच चालला आहे. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या योगेश महांगडे, विजय बालमवार, महेश नार्वेकर यांच्यावर अधूनमधून प्रभारी भार सोपवल्यानंतर २०१४मध्ये हे पद बाहेरुन कंत्राटी स्वरुपात भरले होते. त्यावेळी हिमेश व्होरा यांची या पदावर निवड करण्यात आली.

- Advertisement -

परंतु व्होरा यांनी दीड वर्षांत महापालिकेच्या कारभाराला कंटाळून आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे महापालिकेने पुन्हा अंतर्गत परीक्षा घेवून हे पद भरण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अरुण जोगळेकर यांची निवड झाली. परंतु त्यांच्याकडे कायमस्वरुपी भार देण्याऐवजी ते आधी सांभाळत असलेल्या विभागासह या पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्याची जबाबदारी टाकण्यात आली. त्यामुळे दोन्ही पदांचा भार पेलणे शक्य नसल्याने जोगळेकर यांनी या पदावर काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुन्हा हे पद रिक्त झाले आणि आता एच/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याकडे या विभागाचा तात्पुरता भार सोपवला.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रविणसिंह परदेशी यांनी आयटी विभाग सक्षम करण्याचा निर्णय घेतला. सध्या या विभागात संचालक, उपसंचालकांसह एकूण ४८ पदे असून ही पदेही वाढवून १२५ एवढी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. त्यामध्ये प्रत्येक विभाग व खात्यांचे प्रमुख यांना प्रत्येकी एक माहिती तंत्रज्ञान सहायक उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संचालकांचे पद भरताना अतिरिक्त पदे वाढवण्याचा आणि रिक्त पदे भरण्याचा विचार आयटी विभागाच्या माध्यमातून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -