पवई येथे महिलेचा विनयभंग करणार्‍या चौघांना अटक

raped

पवई येथे रविवारी रात्री भरस्त्यात एका विवाहीत महिलेचा विनयभंग करुन पळून गेलेल्या चारजणांच्या टोळीला मंगळवारी पवई पोलिसांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या चौघांविरुद्ध विनयभंगासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुरज बंटेबहादूर यादव, कैलास सूर्यमन यादव, सतिश रामआशिष गुप्ता आणि माका फेकू गुप्ता यांचा समावेश आहे.

मुलुंड येथे राहणारी 26 वर्षांची महिला तिची मैत्रिण आणि भावासोबत पवईतील हॉटेलमध्ये आली होती. रात्री साडेनऊ वाजता ते तिघेही हॉटेलमधून बाहेर पडले आणि घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील फुट ब्रिजवर चार तरुण उभे होते. या तरुणांनी तिला पाहून अश्लील संभाषण केले. त्यानंतर त्यातील एका तरुणाने तिच्याशी भरस्त्यातच अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिच्या भावाला समजताच त्याने या चौघांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यालाच या चौघांनी जिवे मारण्याची धमकी देत तिथे निघून जाण्यास सांगितले.

या घटनेनंतर या महिलेने पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध विनयभंगासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या आरोपींचा शोध सुरु असतानाच मंगळवारी पवई प्लाझा परिसरातून पळून गेलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात या चौघांनी या महिलेचा विनयभंग करुन त्याच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. याच गुन्ह्यांत त्यांना बुधवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टाने 26 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.