घरमुंबईपत्रीपुलाचे गर्डर हैदराबादहून अखेर कल्याणात दाखल!

पत्रीपुलाचे गर्डर हैदराबादहून अखेर कल्याणात दाखल!

Subscribe

मार्चअखेर वाहतूक सुरू होणार प्रचंड वाहतूक कोंडीतून सुटका

वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कल्याण पत्रीपुलाच्या कासवगती कामामुळे वाहनचालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पत्रीपुलाच्या पूर्व व पश्चिमेला जोडणारा सात गर्डर अखेर सोमवारी हैदराबादहून कल्याणात दाखल झाले. त्यामुळे पत्रीपुलाच्या कामाला चांगलीच गती मिळाल्याचे दिसून येत आहे. मार्च अखेरपर्यंत पत्रीपुलावरील वाहतूक सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कल्याण रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन जुना लोखंडी पत्रीपुलाला शंभर वर्षे झाल्याने व वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने गेल्या दीड वर्षांपूर्वी पाडण्यात आला आहे. मात्र सुरुवातीला अत्यंत धिम्या गतीने होत असणार्‍या कामांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा फटका स्थानिक नागरिक व्यापार्‍यांबरोबरच दररोज या ठिकाणहून ये-जा करणार्‍या हजारो वाहनांनाही बसत आहे. कल्याणचा पत्रीपूल हा कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा असला तरी सुध्दा भिवंडी कल्याण शीळ हा रस्ता प्रामुख्याने कल्याणच्या पत्रीपुलावरून जातो.

- Advertisement -

त्यानंतर हा रस्ता पुढे नवी मुंबई, तळोजा, पनवेल, मुंबई आणि नाशिक महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. पत्रीपुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने त्या विरोधात राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी अनेकवेळा आंदोलन व मेार्चे काढून प्रशासनाचा निषेध केला आहे. कल्याणच्या एका तरुणाने तर पत्रीपुलावर भन्नाट रॅप साँग बनवून या रॅपच्या माध्यमातून सरकारवर टीका केली होती. या पुलाचे गर्डर हैद्राबाद येथे बनवण्यात येत होते.

दरम्यान हा नवीन पूल होण्याच्या कामासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा केला होता. काही आठवड्यांपूर्वी खासदार शिंदे यांनी स्वतः हैद्राबाद येथे जाऊन या गर्डरच्या कामाची पाहणीही केली होती. अखेर हे गर्डर हैद्राबादहून कल्याणात दाखल झाले आहेत. मात्र हे गर्डर टाकण्यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे रेल्वेकडून कल्याण-डोंबिवली रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम करण्यात येईल. त्यानंतर पत्रीपूल वाहतुकीस खुला होईल. मार्च २०२० अखेर पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

- Advertisement -

एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक
ब्रिटिशांनी शंभर वर्षांपूर्वी रेल्वे मार्गावर लोखंडी पत्रीपूल बांधला होता. हा पूल जीर्ण व धोकादायक बनल्याने या पुलावरील वाहतूक बंद करून तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या जागी तीन महिन्यात नवा पूल बांधण्याचे आश्वासन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिले होते. मात्र तब्बल सहा महिन्यांनंतर पुलावर हातोडा पडला. गेल्या दीड वर्षांपासून पुलाचे काम बंद होते. आता त्या कामाला सुरुवात झालेली आहे. हा पूल बंद केल्याने दुसर्‍या बाजूच्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. या पुलावरून कल्याण शीळ मार्गे पनवेल आणि ठाणे-नवी मुंबईकडे जाते. त्यामुळे या पुलावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. एका पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने रूग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडीचा वाहनचालकांना सामना करावा लागतो अशी अवस्था आहे.

तिसरा पत्रीपूलही प्रतिक्षेत
जुना पत्रीपूल पाडल्यानंतर कल्याण पूर्व-पश्चिम प्रवासासाठी नागरिकांना होणारा त्रास, होणारा वेळेचा अपव्यय आणि रहदारीची समस्या यावर लवकरात लवकर दुसर्‍या पत्रीपुलाचे काम सुरू करण्याचे लक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोळ्यासमोर ठेऊन सातत्याने रेल्वे प्रशासन तसेच एमएसआरडीसीकडे सातत्याने पाठपुरावा केला. दुसर्‍या पत्रीपुलाच्या कामाला मंजुरी मिळवत भविष्यात येथील रहदारी समस्या उद्भवू नये, याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तिसर्‍या पत्रीपुलाची देखील मागणी एमएसआरडीसीकडे करून मंजूर करून घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -