Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अखेर घाटकोपरमधील गोळीबार रोड खड्डेमुक्त होणार

अखेर घाटकोपरमधील गोळीबार रोड खड्डेमुक्त होणार

Related Story

- Advertisement -

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या घाटकोपर (प.) येथील गोळीबार रोडच्या काही भागाचे काम आता एका आठवड्यात मार्गी लागणार आहे. त्यामुळे गोळीबार रोड हा खड्डेमुक्त होणार आहे. परिणामी घाटकोपर येथील अमृतनगर, विक्रोळी पार्कसाईट, जगदुशा नगर, गेल्डानगर आदी परिसरातील नागरिकांना, वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तुकाराम पाटील यांच्या हस्ते शिवसेना शाखाप्रमुख संजय कदम, उप शाखाप्रमुख जगदीश कदम, शशिकांत देशमुख,ज्येष्ठ शिवसैनिक रवी देसाई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रविवारी संपन्न झाला.

गोळीबार रोड हा घाटकोपर (प.) भागातील विक्रोळी पार्कसाईट, अमृतनगर भागातील नागरिकांसाठी घाटकोपर स्टेशनला ये-जा करण्यासाठी महत्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक हे नोकरी, धंद्याला ये-जा करण्यासाठी सर्वात महत्वाचा व सुलभ रस्ता आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचतो. मात्र या रस्त्यावरील सततच्या वर्दळीमुळे व वाहतुकीमुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यातही जास्त प्रमाणात खड्डे आढळून येत असतात. मात्र शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांनी या रस्ते कामासाठी विशेष प्रयत्न केल्याने दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचा भीमनगर चौक ते सर्वोदय रुग्णालय हा भाग सिमेंट काँक्रीटचा बनविण्यात आला आहे. मात्र याच रस्त्याचा दुर्गादेवी मंडळ ते श्रीकृष्ण मंदिर ह्या भागातील सिमेंट काँक्रीट रस्ता बनविण्याचे काम आरटीओ च्या परवानगीअभावी रखडले होते. त्यामुळे या भागातील रस्त्यावर दर पावसाळ्यात खड्डे पडलेले आढळून येत असत. ह्या भागातील रस्त्याच्या कामासाठी रस्त्याखालून जाणाऱ्या जलवाहिनीचे कामही या रस्त्याच्या कामासोबत करण्यात येणार होते. त्यासाठी नगरसेवक तुकाराम पाटील यांनी मंजुरीही घेतली होती. तसेच, या रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने त्यामुळे १३६ दुकानदार, रहिवाशी हे बाधित होणार होते ; मात्र पालिकेकडे त्यांना पर्यायी जागा देण्यक्त अडचण आल्याने रस्ता रुंदीकरणाचे कामही रखडले आहे.

- Advertisement -

या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी हा रस्ता काही महिने तरी बंद ठेवावा लागणार होता. मात्र पावसाळा तोंडावर आल्याने आणि आरटीओकडून विविध कारणास्तव परवानगी मिळण्यात अडचण आल्याने या रस्त्याचे वरील भागातील काम रखडले होते. परंतु त्यावर उपाययोजना म्हणून स्थानिक नगरसेवक तुकाराम पाटील यांनी, सिमेंट काँक्रीट ऐवजी डांबरी रस्ता (मास्टीक) बनविण्याचा सुलभ मार्ग काढल्याने आता सोमवारपासून या रस्त्याच्या कामाला जोमाने सुरुवात होणार असून येत्या सात दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे, असे नगरसेवक तुकाराम पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासादायक बातमी! कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा अधिक


- Advertisement -

 

- Advertisement -