घरमुंबईगर्भाशयाच्या बाहेर झाली बाळाची वाढ; आईच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने दुर्मीळ शस्त्रक्रिया...

गर्भाशयाच्या बाहेर झाली बाळाची वाढ; आईच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने दुर्मीळ शस्त्रक्रिया करून वाचवले प्राण

Subscribe

अपवादात्मक परिस्थितीत गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर बाळाची वाढ झाल्याने बाळ आणि आई या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये महिला व प्रसूतिगृह विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री कटके आणि त्यांच्या टीमने आपले कसब पणाला लावत महिलेच्या पोटातील मृत बाळ काढून तिचे प्राण वाचले.

नैसर्गिकरित्या बाळाची वाढ ही मातेच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये होते. परंतु शहापूरमधील एका महिलेच्या चक्क गर्भाशयाच्या पिशवी बाहेर बाळाची वाढ (प्रायमरी अ‍ॅबडॉमिनल प्रेगन्सी) झाली होती. अपवादात्मक परिस्थितीत गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर बाळाची वाढ झाल्याने बाळ आणि आई या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये महिला व प्रसूतिगृह विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री कटके आणि त्यांच्या टीमने आपले कसब पणाला लावत महिलेच्या पोटातील मृत बाळ काढून तिचे प्राण वाचले. अशा प्रकारची परिस्थिती कोट्यवधीमध्ये एकाच्या बाबतीत घडते. आतापर्यंत जगामध्ये अशाप्रकारे फक्त २४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

शहापूरपासून १० किलोमीटरवर असलेल्या रास गावातील रहिवासी असलेले सुभाष बांगारी (वय ३५) हे महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला आहेत. त्यांची पत्नी शोभा बांगारी ही चार महिन्यांची गर्भवती होती. २८ मे रोजी शोभा यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांना स्थानिक डॉक्टरकडे दाखवले. शोभा गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तातडीने सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांना शोभाच्या पोटातील बाळाची वाढ ही गर्भाशयाच्या पिशवीऐवजी बाहेर झाली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने त्यांना ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यास सांगितले. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना रुग्णालयात पोहोचण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथे कोरोनाचे असलेले रुग्ण, रुग्णाची गंभीर परिस्थिती आणि डॉक्टर उपलब्ध नसल्याने शोभा हिला तातडीने जे.जे. रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यामुळे सुभाष यांनी पत्नी शोभा हिला घेऊन रात्री २ वाजता जे.जे.रुग्णालय गाठले. तोपर्यंत तिच्या पोटामध्ये प्रचंड दुखू लागले होते. शोभाच्या सोनोग्राफीचा अहवाल पाहून अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी तातडीने स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री कटके यांना संपर्क साधला. त्यांनी तातडीने रुग्णालायत धाव घेतली. रुग्णाचे सोनोग्राफी अहवाल आणि अन्य काही चाचण्या केल्यानंतर बाळाची वाढ गर्भाशयाच्या पिशवीऐवजी पोटातील आतड्यांमध्ये झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोभाच्या पोटातील बाळ हे तिच्या आतड्या आणि प्लासेंटा याला जोडले गेले होते. यातूनच त्याला पोषणतत्त्वे आणि आहार मिळत होता. अशा परिस्थितीमध्ये बाळाची पूर्ण वाढ होईपर्यंत ते आईच्या आतड्यांमधून पोषणतत्त्वे घेते. त्यामुळे आतडे आणि रक्तवाहिन्या फुटून पोटात रक्तस्राव सुरू झाला होता, तसेच रक्ताच्या गाठीही झाल्या होत्या. शोभाच्या पोटामध्ये जवळपास दीड लिटरपेक्षा जास्त रक्तस्राव झाला होता. हिमोग्लोबिनची पातळी ही ५ ग्रॅमपेक्षा खाली आली होती. ही पातळी साधारणपणे १२ ग्रॅमपर्यंत असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणामध्ये रक्तस्राव झाल्यास बाळाचा आणि आईच्या जीवाला धोका निर्माण होऊन त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. राजश्री कटके यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आपले सर्व कसब पणाला लावत डॉ. कटके आणि त्यांच्या टीमने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून शोभाचे प्राण वाचवले. शस्त्रक्रियेनंतर शोभाला ५ दिवस आयसीयूमध्ये ठेवले होते. शोभाची प्रकृती आता उत्तम असल्याचे डॉ. कटके यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत ही डॉ. कटके यांनी दीड वर्षात अनेक किचकट व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

- Advertisement -

डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर तातडीने मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितल्याने पायाखालची जमीन सरकली होती. मात्र, जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेवर व तातडीने उपचार करून माझ्या पत्नीचे प्राण वाचवल्याचे शोभाचे पती सुभाष बांगारी यांनी सांगितले.

गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर बाळाची वाढ होणे हा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. त्यातच शोभाच्या पोटातील आतड्या आणि रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव झाला होता. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. माझे सर्व कौशल्य पणाला लावून यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून शोभाचे प्राण वाचवल्याबद्दल आनंद वाटत आहे.
– डॉ. राजश्री कटके, स्त्री रोग व प्रसूती विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय
डॉ. राजश्री कटके या एक उत्तम डॉक्टर असून, आजवर त्यांनी अनेक किचकट व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
– डॉ. रणजित माणकेश्वर, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -