झी स्टुडिओजला अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटचा ‘दे धक्का’

'दे धक्का २' च्या निर्मितीबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला असून, आता अमेय खोपकर एण्टरटेन्मेंट 'दे धक्का २'ची निर्मिती करणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे. अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटने झी स्टुडिओजला मोठा धक्का दिला आहे.

amey khopkar
मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर

मराठी चित्रपट ‘दे धक्का’चा दुसरा भाग ‘दे धक्का २’ च्या निर्मितीबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला असून, आता अमेय खोपकर एण्टरटेन्मेंट ‘दे धक्का २’ची निर्मिती करणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे. अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटने झी स्टुडिओजला मोठा धक्का दिला आहे. जवळपास आठ-दहा महिन्यांपूर्वी अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटच्यावतीने ‘दे धक्का २’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. परंतु ‘दे धक्का’ या चित्रपटाची निर्मिती ‘झी’कडून करण्यात आली होती. त्यामुळे दे धक्का चित्रपटाचे हक्क झीकडे असून, दे धक्का २ ची निर्मिती अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटला करता येणार नाही, असे झीचे म्हणणे होते.

दे धक्का २ या चित्रपटाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा

सहा महिन्यांपूर्वीपासून हा वाद उच्च न्यायालयात होता. उच्च न्यायालयाने दोघांच्या बाजू समजून घेऊन नुकताच त्यावर निकाल दिला. यावेळी उच्च न्यायालयाने झीचा दावा फेटाळून दे धक्का २ च्या निर्मितीचा अधिकार अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटला असल्याचे नमूद केले. त्यामुळे आता दे धक्का २ या चित्रपटाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत अमेय खोपकर म्हणाले की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. तसेच ‘दे धक्का २’ या चित्रपटाच्या टीमचे त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी अभिनंदन करतो.