मुंबई : मुंबईचा इतिहास, येथील कला, संस्कृती, शैक्षणिक सुविधा, भौगोलिक महत्त्व, पुरातन वास्तू, पर्यटन स्थळे तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडी यामुळे मुंबई शहराची प्रतिमा जगामध्ये उंचावलेली आहे. सर्वधर्मसमभाव जोपासून, मुंबई शहराचा अधिकाधिक विकास होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू या, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांनी केले आहे.
हेही वाचा – आम्ही गळती थांबवली अन् मजबूत अर्थव्यवस्था बनवली, पंतप्रधान मोदींचा दावा
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मंगळवारी मुंबई महापालिका मुख्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषण करताना पालिका आयुक्त चहल यांनी, महापालिकेने मुंबई शहराच्या विकासासाठी केलेली रस्ते कामे, आपला दवाखानामार्फत जनतेला दिलेल्या वैद्यकीय सुविधा, गरीब विद्यार्थ्यांना दिले जाणारे आधुनिक आणि डिजिटल शिक्षण, देशातील पहिल्या-वहिल्या कोस्टल रोडची कामे, फेरीवाल्यांना आर्थिक मदत, गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगार, त्यासाठी यंत्रसामग्रीचे वाटप, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केले जात असलेले प्रयत्न आदींचा लेखाजोखा थोडक्यात मांडला.
मुंबई शहराचा अधिकाधिक विकास होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू या. ‘कचरामुक्त, प्रदूषणमुक्त मुंबई आणि गतिमान मुंबई’ शहर बनवूया, असा संकल्प आयुक्त इकबाल चहल यांनी केला आहे.
कोस्टल रोडची कामे मे २०२४ पर्यंत पूर्ण करणार
देशातील पहिल्या कोस्टल रोड प्रकल्पाची कामे मे 2024पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे (भरणी करून) 96.51 हेक्टर नवीन जमीन उपलब्ध होणार आहे. त्यापैकी सुमारे 70 हेक्टर जागा लँडस्केपिंग, प्रोमेनेड, सायकल ट्रॅक, जॉगिंग पार्क इत्यादी सुविधांसाठी उपलब्ध असेल. तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून किमान अतिरिक्त वेळ आणि खर्चासह प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असून आजपर्यंत सदर प्रकल्पाचे 76 टक्के काम पूर्ण झालेले आहे.
हेही वाचा – लाल किल्ल्यावर खुर्ची रिकामी ठेवून, व्हिडीओद्वारे खर्गेंचे पंतप्रधान मोदींवर शरसंधान
84,384 फेरीवाल्यांना आर्थिक मदत
मुंबई हद्दीतील पदपथावर व्यवसाय करणाऱ्या एकूण फेरीवाल्यांपैकी 84,384 फेरीवाल्यांना ‘पंतप्रधान स्वनिधी योजना’ अंतर्गत बँकांमार्फत आर्थिक मदत करण्यात आलेली आहे, असा दावा पालिका आयुक्त चहल यांनी यावेळी केला.
प्राण्यांसाठी आरोग्य सुविधा व दहनभट्टी
महालक्ष्मी धोबी घाट येथील महापालिकेच्या एक एकर जागेत पाळीव प्राण्यांचे आणि भटक्या प्राण्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पशुवैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज चार मजली रुग्णालय डिसेंबर २०२३पर्यंत तयार होत आहे. हे रुग्णालय सर दोराबजी टाटा ट्रस्ट व मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर उभारण्यात येत आहे.
त्यासोबतच मालाड येथील प्राणी दहनभट्टी याच महिन्यात सुरू होत असून, प्राणी दहनभट्टीची सुविधा ही पाळीव श्वान, भटके मृत श्वान, मांजरी, पक्षी यांच्याकरिता मोफत उपलब्ध असणार आहे.
गरीब, गरजू महिलांना स्वयंरोजगार
मुंबई महापालिकेमार्फत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, घरघंटी, मसाला कांडप यंत्रखरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात आले. या माध्यमातून एकूण 26,855 महिलांना यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले आहे. यंदा गणेशोत्सवामध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन पालिका आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना केले.