महावितरण व्हाट्सअँपद्वारे ग्राहकांशी ठेवणार संपर्क

मीटर रिडिंग,वीजबिल,बील भरल्याचा मेसेज पाठवणार

महावितरण राज्यातील दोन कोटींहून अधिक वीज ग्राहकांसाठी आता वॉट्सअँप सेवेचा वापर करण्याच्या तयारीत आहे. वॉट्स एपच्या माध्यमातून वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा खंडीत करणार असल्याची नोटीस पाठवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्यासाठीच वॉट्स एप बिझनेसच्या माध्यमातून ही नोटीस पाठवता येते का यासाठीची चाचपणी महावितरणकडून करण्यात येत आहे. सध्या महावितरणच्या अडीच कोटी ग्राहकांपैकी २ कोटी वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविला आहे.

महावितरण सध्या राज्यातील २ कोटी वीज ग्राहकांना महिन्यापोटी ९ कोटी ते दहा कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर एसएमएस पाठविते. त्यामध्ये मीटर रिडिंग, महिन्याच वीजबिल, बिलभरण्यासाठीचा एसएमएस अशा प्रकारच्या एसएमएसचा समावेश असतो. प्रत्येक एसएमएससाठी महावितरणला ७ पैसे इतका खर्च येतो. वॉट्सअँपचा वापर करून हा खर्च कमी करण्यासाठी महावितरणचा प्रयत्न आहे. वॉट्सअँपवरून वीज बिलाचा मॅसेज पाठवता यावा यासाठी वॉट्स एपसोबत कंपनीची चर्चा सुरू आहे. महावितरणच्या रहिवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक अशा ९५ टक्के ग्राहकांकडून महिन्यापोटी वीजबिल भरण्यात येते. तर वीजबिल न भरणार्‍यांचा टक्का हा ३ टक्के ते ५ टक्के इतका आहे. या ग्राहकांना नोटीस ही एसएमएसच्या माध्यमातून सध्या पाठवण्यात येते. त्याएवजी ही नोटीस वॉट्सएप मॅसेजने पाठवण्याचा महावितरणचा विचार आहे.

ग्रो ग्रीनला नापसंती

वीजबिल घरपोच मिळवण्याएवजी ईमेलवर मिळवण्याच्या गो ग्रीनचा पर्याय महावितरणच्या ग्राहकांना रूचलेला नाही. या मोहिमेला अडीच कोटी ग्राहकांपैकी अवघ्या ४ हजार जणांनी प्रतिसाद दिला आहे. महावितरणच्या ४० लाख ग्राहकांकडून सध्या ऑनलाईन बिल भरणा करण्यात येतो. तरीही गो ग्रीन पर्यायाकडे तितकेसे ग्राहक वळलेले नाहीत.