घरमुंबई२६/११ च्या आठवणींनी मुंबईकर गहिवरले

२६/११ च्या आठवणींनी मुंबईकर गहिवरले

Subscribe

ठिकठिकाणी शहिदांवर श्रद्धांजली अर्पण

दहा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेले पोलीस आणि जवान यांना श्रद्धांजली अर्पण करतेवेळी सोमवारी मुंबईकर पुन्हा एकदा गहिवरले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये १६६ जणांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. तेव्हापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईकरांना ती काळरात्र पुन्हा आठवली. या हल्ल्यात शहिद झालेल्या १८ लोकसेवकांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई पोलीस दलातर्फे गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आलेल्या शहिद तुकाराम आेंबळेंच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर नायगाव येथील मैदानात शहिद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध करण्यात आला.

मुंबईतील कुलाबा परिसरात असणारे ताज हॉटेल, नरीमन हाऊस, लिओपोर्ल्ड कॅफे या ठिकाणी हा हल्ला झाला होता. आज या भ्याड हल्ल्याचा निषेध करत या परिसरात शहिदांना आणि हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कामा रुग्णालय, सीएसएमटी स्थानक या ठिकाणीसुद्धा या आठवणी जागवण्यात आल्या. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना अनेक मुंबईकरांनी आपला राग व्यक्त करत अजमल कसाब आणि इतर ९ दहशतवाद्यांचा निषेध केला, सोबतच अजमल कसाबसारख्या क्रुरकर्म्याला फाशी न देता त्यापेक्षा वाईट पद्धतीने मारायला हवे होते, असा रागसुद्धा यावेळी अनेक मुंबईकरांनी व्यक्त केला.

- Advertisement -

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनमध्ये हजारो मध्य रेल्वे प्रवाशांनी २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांची आठवण म्हणून मध्य रेल्वेने स्मृती स्तंभच उभारला आहे. सेंट झेवियर्स कॉलेजच्या ज्या गल्लीत हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळस्कर यांना वीरमरण आले, त्याठिकाणी अनेक मुंबईकरांनी मेणबत्त्या पेटवून व पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. मनसेच्या वतीने याठिकाणी शहीद पोलिसांचे कटआऊट लावण्यात आले आहे. त्याशिवाय काँग्रेसच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्सही उभारण्यात आले.

हल्ल्याच्या आठवणी कायम स्मरणात राहणार

हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडंट व नरिमन हाऊस या दहशतवादी हल्ल्यांच्या ठिकाणीही अनेकांनी भेटी देऊन बळींच्या आठवणींना श्रद्धांजली वाहिली. त्या दिवशी जे घडले ते घडायला नको होते पण ती काळरात्र चालून आली होती. या घटनेला जरी १० वर्षे पूर्ण झाली असली तरी ती घटना आम्ही विसरु शकत नाही. त्या कटू आठवणी शेवटपर्यंत स्मरणात राहतील, अशी भावना अनेक मुंबईकरांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -