महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेवर ‘करोना’चे सावट

मुंबई महापालिकेच्या सन २०२०-२१चा अर्थसंकल्पीय चर्चेला सभागृहात सुरुवात झाली असून या अर्थसंकल्पीय चर्चेवर ‘करोना’चे सावट पसरले आहे.

bmc
महापालिका

मुंबई महापालिकेच्या सन २०२०-२१चा अर्थसंकल्पीय चर्चेला सभागृहात सुरुवात झाली असून या अर्थसंकल्पीय चर्चेवर ‘करोना’चे सावट पसरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा अर्थसंकल्प चर्चेविना मंजुर केला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी होणार्‍या महापालिकेच्या सभेत कोणत्याही नगरसेवकाला तथा गटनेत्यांना भाषण करायची परवानगी न देता हा अर्थसंकल्प मंजूर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेचा सन २०२०-२१ चा ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सादर केला. यामध्ये ६४० कोटी रुपयांचा अंतर्गत फेरबदल करत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका सभागृहात मांडला. त्यानंतर शुक्रवारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या भाषणाद्वारे खर्‍या अर्थाने अर्थसंकल्पीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणानंतर सोमवारी १६ मार्चपासून नगरसेवकांच्या भाषणाला सुरुवात होणार होती. परंतु भाजपच्या महापालिका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सोमवारची सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून नगरसेवकांच्या अर्थसंकल्पावरील भाषणांना सुरुवात होईल,असे वेळापत्रक तयार केले होते. परंतु ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी लोकांनी जमा होवू नये असे आवाहन करताना तसेच ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळांना सुट्टी केली आहे. याचा आधार घेत महापालिकेचे अर्थसंकल्पीय चर्चा गुंडाळून मंगळवारी अर्थसंकल्प मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पावर भाषण करण्याची तयारी सर्व नगरसेवकांनी केली आहे. तसेच सर्वच नगरसेवकांची यावर बोलण्याची इच्छा असते. वर्षातून एकदा अशाप्रकारे बोलण्याची संधी लाभते, हे जरी खरे असले तरी ‘करोना’चा धोका लक्षात घेता मंगळवारी सभागृह बोलावून त्यात अर्थसंकल्प मंजूर करण्याचा निर्णय महापौरांसह गटनेत्यांनी घेतला असल्याची माहिती मिळत आहे. गटनेत्यांची भाषणे पार पाडून त्यानंतर अर्थसंकल्प मंजूर करावा,अशी सूचना पुढे आली होती. परंतु गटनेत्यांना भाषण करण्याची संधी दिल्यास नगरसेवक नाराज होतील. त्यामुळे कुणालाही भाषण करू न देता सन २०१९-२०च्या धर्तीवर अर्थसंकल्प मंजूर करण्यात येईल, असे समजते.

मागील अर्थसंकल्पाच्यावेळी लोकसभा आचारसंहितेचे कोणत्याही चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर भाषण करण्याची जय्यत तयारी केली होती. भाजपच्याही ८२ नगरसेवकांनी भाषण करण्याची तयारी केली होती. तसेच काँग्रेससह शिवसेनेच्या नगरसेवकांनी तयारी केली होती. परंतु यावेळीही त्यांच्या आनंदावर ‘करोना’मुळे विरजण पडणार आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी कोणत्याही चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर होणार असल्याचे दिसून येत आहे.