घरCORONA UPDATEमुंबईतील 'या' विभागात कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभराच्या वर, तर 'हे' विभाग सुरक्षीत!

मुंबईतील ‘या’ विभागात कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभराच्या वर, तर ‘हे’ विभाग सुरक्षीत!

Subscribe

संपूर्ण मुंबई आता कोरोनाच्या विळख्यात गुरफटत चालली आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तरेची सीमा रेषा असलेल्या दहिसर विभाग वगळता अन्य विभागांनी १०० पेक्षा अधिक रुग्णांची संख्या गाठलेली आहे . संपूर्ण मुंबईत आर-उत्तर अर्थात दहिसर हा एकमेव विभाग असा आहे, जिथे कोरोना रुग्णांची आजमितीस ७० पर्यंतच सिमित आहे. मात्र, ही सीमा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न आर-उत्तर विभागातील महापालिकेचे सेनापती आण त्यांचे सैनिक करत असले तरी या भागातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या गणपत पाटील नगरमध्ये आता कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत या वस्तीत चार रुग्ण आढळून आले असले तरी शोध मोहिम राबवून या झोपडपट्टीत कोरोनाग्रस्तांना बाहेर काढण्याचा प्रयत्न महापालिकेच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे या विभागात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा स्फोट झाल्यास लवकरच याही विभागाची शंभरी पार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत वरळीचा जी-दक्षिण विभाग, धारावी-माहिम-दादरचा जी-उत्तर विभाग, भायखळा ई विभाग, मलबार हिल, ग्रँट रोड, कुर्ला एल विभाग, विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व व पश्चिम या अनु्क्रमे के-पूर्व व के-पश्चिम तसेच चेंबूर एम-पश्चिम विभाग आदी वस्ती मुंबईतील २४ विभागांमध्ये पहिल्या काही स्थानावर आहेत. वरळीने आतापर्यंत हजारचा पल्ला गाठला आहे. तर त्याखालोखाल धारावी, कुर्ला आदीनेही ७०० ते ८००च्या पुढे मजल मारली आहे. मात्र, मार्च महिन्यापासून शेवटच्या तीन क्रमांकावर असलेले आर-उत्तर,  सी आणि टी विभागापैकी सी विभागाने यापूर्वीच शंभरी पार केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये एकाच दिवशी ५५रुग्ण आढळून आल्याने या विभागानेही ७६ वरून १२३ पर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे दहिसरचे आर-उत्तर विभाग हा एकमेव असा आहे की ज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या बुधवारपर्यंत ७०एवढी आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व विभागांनी शंभरी ते हजारी पार केलेली असतानाच हाच एकमेव विभाग कोरोनापासून नियंत्रित राखला गेला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे याच विभागात ८० ते ९० हजार लोकसंख्या असलेला गणपत पाटील नगर आहे. दहिसरमध्ये मिनी धारावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपत पाटीलमध्ये  सुरुवातीपासून महापालिकेने आरेाग्य सेविकांच्या मदतीने ताप तपासणी सुरु करत तपासणी मोहिम राबवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सुरुवातीला एकही रुग्ण आढळून न आल्याने दुसऱ्यांदा पुन्हा तपासणी शिबिर आयेाजित करण्यात आला आहे. त्यामध्ये पुन्हा चार रुग्ण आढळून आल्याने ही तपासणी मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून गणपत पाटील नगरवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे या विभागात संसर्गाचा प्रादु्र्भाव नियंत्रणात राखण्यात महापालिकेला  यश येत आहे.

याबाबत आर-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी  संपर्क साधला असता त्यांनी गणपत पाटील नगरमध्ये आतापर्यंत ४ रुग्ण आढळून आले असून या विभागात ताप तपासणी मोहिम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या  विभागात  कोरोना रुग्णांची संख्या ७० एवढी असून यामध्ये ४ मृतांचा समावेश आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात, पाचशेहून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -