एलपीजी गॅसचा पर्याय स्वच्छ, पण परवडणारा दर हवा

लाकडाचा इंधन म्हणून वापर सुरूच

pradhan mantri ujjwala yojana

एलपीजी शेगडीचा अनुभव घेतलेल्या प्रत्येक महिलेला त्याचा वापर करण्याची इच्छा आहे, मात्र सिलेंडरचा खर्च परवडत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरमहा बदलणारा सिलेंडरचा दर पाहता किमती आणखी वाढणार तर नाही ना, अशीही भीती अनेकांच्या मनात आहे. गॅसचा पर्याय असतानाही लाकडाचा वापर इंधनासाठी करावा लागतो. म्हणूनच अशा योजनेच्या अंमलबजावणीत किफायतशीर दराच्या बाबतीत शासनाने निर्णय घ्यायला हवा, असेही मत महिलांनी मांडले आहे.पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणी राज्य महिला आयोगातर्फे संशोधन अभ्यास करण्यात आला आहे. उज्ज्वला योजनेच्या निमित्ताने राज्यातील चार जिल्ह्यात सर्वेक्षण अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे.

त्यानिमित्ताने एका अहवालाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये आरोग्य,पर्यावरण याबरोबरच गरीबीरेषेखालील महिलांच्या आर्थिक उन्नतीलाही महत्व द्यायला हवे, अशा सूचना या सर्वेक्षणातून देण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेमार्फत गॅसची शेगडी वापरणार्‍याची संख्या ३६.७५ टक्के असल्याचे या सर्वेक्षणातून आढळले आहे. इंधनाचे दर परवडत नसल्यानेच पर्याय म्हणून लाकूड वापरावे लागते, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

असे झाले सर्वेक्षण

पंतप्रधानांनी आणलेल्या या उज्ज्वला योजनेला महाराष्ट्रात मिळालेला प्रतिसाद कसा आहे. महिलांची मते काय आहेत हे जाणून घेणं हा अभ्यासाचा मुख्य विषय होता. हे सर्वेक्षण मार्च २०१८ ते मे २०१८ मध्ये करण्यात आले होते. त्याकरिता आर्थिकदृष्ट्या मागासलेला भाग म्हणून मराठवाडा जिल्ह्यातील लातूर,उस्मानबाद, नांदेड आणि बीड या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. चारही जिल्ह्यांमधील प्रत्येकी शंभर याप्रमाणे एकूण चारशे महिलांचा सहभाग घेण्यात आला. स्वयंपाकाच्या इंधनापोटी होणार्‍या कष्टातून महिलांची सुटका झाली का?, महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी योजनेची मदत झाली का? महिलांना स्वच्छ आणि तात्काळ एलपीजी इंधन मिळाल्याने वाचलेल्या कष्टाचा आणि उपलब्ध वेळेचा उपयोग त्या स्वत:साठी आणि कुटूंबासाठी कसा करतात? चुलीसाठी लागणार्‍या लाकूडफाट्यासारखे इंधन जाळल्याने तयार होणारा धूर प्रदूषण करतो. या धुरामुळे आरोग्यावर वाईट परिमाण होतो याची जाणीव महिलांना झाली का? लाकूडफाट्यासाठी वृक्षतोड केल्याने होणारे दुष्परिणाम शिवाय पर्यावरणाच्या विविध घटकांबद्दलची जाणीव अभ्यासणे हा या संशोधनाचा मुख्य हेतू होता.

कोणत्या इंधनाचा कसा वापर

फक्त गॅसची शेगडी वापरणारे ३६.७५ टक्के
गॅस संपल्यावर तर इंधन वापरकर्ते १७ टक्के
गॅस आणि इतर इंधन वापरकर्ते १४.२५ टक्के
गॅसशिवाय इतर इंधनाचा वापरणारे ३२ टक्के

सर्वेक्षणातील मुख्य बाबी

*चुलीच्या धुरामुळे छप्पर काळे होते. घरातले कपडे काळे होतात. नागरिकांच्या शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम होतात.

*चारही जिल्ह्यातील स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करीत असताना या धुरामुळे दमा, खोकला, श्वसनाचे आजार, डोळ्यांचे विकार,डोकेदुखी,सर्दी यासारखे आजार होत असल्याचं महिलांनी सांगितलं.

*एलपीजी गॅसमुळे सगळ्याच महिलांचा वेळ वाचू लागला.

*एलपीजीचा वापर वाढवण्यासाठी त्याची किंमत आणखी कमी व्हायला हवी, असे मत अनेकांनी मांडले.

*इंधनाच्या किमती परवडत नसल्यानेच लाकडाचा पर्यायी वापर करावा लागतो असेही मत काहींनी मांडले.

*एलपीजी शेगडी घरी येणे ही प्रत्येक महिलेला अभिमानाची बाब वाटते.

रौप्य महोत्सवी वर्षात राज्यातील महिलांच्या जीवनाचा,त्यांना सतावणार्‍या जटिल प्रश्नांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व्हावा ही आमची कल्पना होती. या अभ्यासातून काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधून ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, म्हणून आम्ही अनेक संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन दिले. त्या प्रकल्पातीलच हा संशोधन अहवाल आहे. गॅससारखी छोटीशी बाब महिलांसाठी कशी गेमचेंजर ठरु शकते हे या योजनेने दाखवून दिले आहे.
– विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग.