राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून मविआत फूट पडण्याची शक्यता, राजकीय चर्चेला उधाण

देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या चर्चेला जोरदार उधाण आलं आहे. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी भाजप आणि विरोधकांकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहे. एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारीची संधी दिली आहे, तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी घोषित केली आहे. परंतु एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधक हे यशवंत सिन्हा यांना मतदान करण्यास सांगत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी शिवसेनेकडे केली आहे. त्यामुळे आता मविआत फूट शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता खासदार सुद्धा बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु शिवसेनेतील काही नेत्यांनी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

काल बुधवारी शरद पवार यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. या बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या प्रचाराला गती देण्याची चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे भालचंद्र कांगो आणि आरजेडीचे एडी सिंग उपस्थित होते. देशासमोरील समस्यांशी लढण्यासाठी आम्ही आमचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, अशा प्रकारचं ट्विट देखील शरद पवारांनी केलं.

हेही वाचा : ‘त्या’ शुक्राचार्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका

शरद पवारांनी जरी यशवंत सिन्हा यांना मतदान करण्यास सांगितले असले तरी दुसरीकडे मात्र, शिवसेनेच्या गोट्यातून आमदार, खासदार एकनाथ शिंदे गटाशी हातमिळवणी करताना दिसत आहेत. मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना इतर खासदारांसह मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात शेवाने यांनी पत्र देखील सादर केले होते. त्यामुळे आता मविआतील नेत्यांचे ऐकमेकांचे विचार जुळणार का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपत आहे. त्याआधीच देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. राष्ट्रपतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असून जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत.


हेही वाचा : जाणून घ्या! राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? मतमोजणीचं गणित कसं असतं?