राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव असावं, मुख्यमंत्र्यांचा संकल्प

प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव निर्माण करण्याचा निर्धार

the resolution of the Chief Minister is to make book village in every district of the state
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव असावं, मुख्यमंत्र्यांचा संकल्प

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा व गौरव दिनानिमित्त जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्याला मराठी असल्याचा अभिमान बाळगा असे म्हटले आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव निर्माण करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकल्प केला आहे. तसेच परदेशात असलात तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगा आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मी मराठी, माझी मराठी!’ बाणा जपू या! असे आवाहन केले आहे. मराठीत विचार करूया, मराठीत बोलूया, व्यक्त होऊया. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच, या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. परदेशातील व्यक्ती त्यांच्या भाषेतच बोलतात आपणही आपल्याला कमी लेखू नये. परदेशात गेल्यावर मराठी मातृभाषेवर प्रेम असते. मराठी भाषा सोपी करणे आणि मराठीचा वापर करणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगल्याशिवाय त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात पुस्तकाचं गाव एकच का असावं, महाराष्ट्रात मराठी भाषेचा विकास पोहचायला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात १ पुस्तकाचं गाव असले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मराठी पाऊल पुढे पडण्यासाठी आपल्याला पाऊल पुढे टाकले पाहिजे. पुढच्या वर्षापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव निर्माण करण्याचा निर्धार केल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.