घरमुंबईमाहुली गडाकडे जाणारा रस्ता मंजुरीनंतरही रखडला

माहुली गडाकडे जाणारा रस्ता मंजुरीनंतरही रखडला

Subscribe

शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असणार्‍या ऐतिहासिक माहुली गडाकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊनही या रस्त्याचे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केल्याने माहुली चांदरोटी रस्ता रखडला आहे. यामुळे माहुली गडाकडे जाणार्‍या शिवप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची एकच लाट पसरली आहे. या रस्त्याचे काम येत्या आठ दिवसात सुरू न केल्यास बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे आवाळे विभाग प्रमुख प्रदिप आगिवले यांनी दिला आहे.

माहुली या रस्त्याची दैन्यावस्था पाहता गेल्या अनेक वर्षांच्या येथील स्थानिक ग्रामस्थांच्या वारंवार मागणीनंतर आसनगाव ते माहुली, चांदरोटी, गावाकडे जाणार्‍या रस्त्यासाठी बांधकाम विभाग ठाणे येथून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या कामाला सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळूनही या रस्त्याचे काम सुरू करण्यास अभियंत्यांनी चालढलकल सुरू केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. केवळ अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने सरकारी मंजुरी नंतरही माहुली रस्त्याचे काम रखडल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आपल्या मनमानीने अभियंता आणि संबंधित ठेकेदार हे रस्त्याचे काम सुरू करणार आहेत का, असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. दरम्यान, रस्त्याचे काम रखडल्याने माहुली चांदरोटी या रस्यावरून रोज ग्रामस्थांना तसेच वाहनचालकांना खड्ड्यांंनी व्यापलेल्या रस्त्यातून अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. माहुली, चांदरोटी, मामनोली, गाव तसेच पुढे माहुली गडाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम येत्या आठ दिवसात सुरू करण्यात आले नाही, तर आम्हा स्थानिक ग्रामस्थांना तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे आवाळे विभागप्रमुख प्रदिप आगिवले यांनी प्रशासनाला दिला आहे.

- Advertisement -

आसनगाव माहुली चांदरोटी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. एकूण ८ किलोमीटर अंतर लांबी असलेल्या या रस्त्याचे साडेतीन कोटींचे टेंडर झाले असून मंत्रालयातील अंतिम मंजुरीसाठी या कामाचे अंदाजपत्रक पाठवण्यात आले असून रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.
– उत्तम निकम, उप अभियंता, (बांधकाम विभाग) ग्रामसडक योजना, ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -