घरमुंबईछोट्यांना विज्ञान सफरीचा मोठा अनुभव

छोट्यांना विज्ञान सफरीचा मोठा अनुभव

Subscribe

‘आपलं महानगर’च्या कार्यक्रमात मुलांनी अनुभवले अद्भुत जग

विज्ञानाचे प्रयोग पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर उमटणारे आश्चर्यकारक भाव… प्रयोग करण्यासाठी चाललेली धडपड… प्रयोगाबाबत मनात निर्माण झालेले प्रश्न… त्याचे निरसन करण्यासाठी मार्गदर्शकांवर प्रश्नांचा भडिमार… प्रत्येक प्रयोगानंतर निर्माण होणारी उत्कंठा अशा वातावरणात बुधवारी ‘विज्ञान सफर’मध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. लहान दोस्तांना विज्ञानातील गमतीजमती अनुभवता यावी यासाठी ‘आपलं महानगर’ने ‘विज्ञानाची सफर’ आयोजित केली होती. वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात झालेल्या या विज्ञानाच्या अनोखी सफरीमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संशोधन व प्रयोग करून पाहत ते जवळून अनुभवण्याचा आनंद घेतला.

विज्ञान हा पुस्तकी विषय नसून तो अनुभवण्याचा विषय असल्याचे म्हटले जाते. कोणतीही गोष्टी प्रयोगाच्या माध्यमातून किंवा स्वत: करून पाहिल्यास तिचा परिणाम दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या मनावर राहतो. परंतु, आपल्याकडे विद्यार्थ्यांना शाळेच्या चार भिंतीमध्येच विज्ञान हा विषय शिकवला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये आवड निर्माण होण्याऐवजी त्यांच्या मनात भिती निर्माण होते. सध्या शाळेला सुट्टी असल्याने ‘आपलं महानगर’ छोट्या दोस्तांना विज्ञान जवळून अनुभवता यावे, त्यामध्ये त्यांना रुची निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घेत बुधवारी नेहरू विज्ञान केंद्रामध्ये एक विशेष ‘विज्ञान सफर’ आयोजित केली होती. या सफरीमध्ये बच्चे कंपनी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

- Advertisement -

यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांच्या माध्यमातून विश्वाच्या उत्पत्तीचा उलगडा, न्यूट्रॉनबाबत सखोल संशोधन, थर्मोन्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती, मनुष्य आणि यंत्र, 150 लाख वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनोसॉरचा इतिहास व आकाशगंगेची निर्मिती व आकाशगंगेतील सर्व ग्रहांचा इतिहास व माहिती देण्यात आली. डायनोसोरच्या विविध प्रतिकृती पाहताना विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना डायनोसोरसोबत प्रतिकृती काढण्याचा मोह आवरला नाही. टीव्हीवर पाहण्यात येणार्‍या डायनोसॉरची भव्य प्रतिकृती पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर उत्सुकता दिसून येत होती. अनेकांनी डायनोसॉरला हात लावून पाहण्याचाही प्रयत्न केला. डायनोसॉरसोबत असलेल्या अन्य प्राण्याचेही विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण दिसून आले. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आकाशगंगेची सफर करताना विद्यार्थ्यांना पृथ्वीबरोबरच प्रत्येक ग्रह विद्यार्थ्यांना जवळून पाहता आला. इतकेच नव्हे तर त्याबद्दल मिळालेल्या माहितीने ते भारावून गेले.

मंगळ, बुध या ग्रहांप्रमाणेच पृथ्वीचे आकाशातून दिसणारे सौंदर्य व बच्चे कंपनीचा लाडका चांदोबा याचे दर्शन घेताना ते भारावून गेले होते. आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या शनीच्या कडेवर बसल्याचा आनंदही त्यांना अनुभवता आला. नेहरू विज्ञान केंद्रातील शिक्षणाधिकारी शीतल चोपडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मधूर वाणीने अलगद अवकाशत नेत त्यांना आकाशगंगेची माहिती दिली.

- Advertisement -

स्पार्क थिएटरमध्ये विद्यार्थ्यांना विद्युत चुंबकीयचे दाखवण्यात आलेले प्रयोग, 25 हजार ते एक लाख वोल्टने चार्ज केलेल्या वॅन डी ग्राफ जनरेटरच्या माध्यमातून विजेच्या जोडणीशिवाय पेटलेला बल्ब पाहून विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर जनरेटरच्या माध्यमातून कोणत्याही स्पर्शाशिवाय विद्यार्थ्यांचे उभे राहिलेले केसामुळे त्यांचा दिसणारा लूक हे पाहून विद्यार्थ्यांनी हसू फुटले. केंद्रामधील हृदयाची सफर करताना त्याचे पडणारे ठोके विद्यार्थ्यांनी हृदयातच जाऊन अनुभवले. हृदयाचे कार्य कसे चालते याची माहिती त्यांना यावेळी मिळाली. त्याचप्रमाणे मेंदूच्या कोणत्या भागावर दाब दिल्यास शरीराचा कोणता अवयव हालचाल करतो याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना येथे करता आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आभासी चित्रांद्वारे थेट बर्फाच्छादित प्रदेशात नेऊन त्यांना पेंग्विन व डॉल्फिन पाहण्याचा आनंद लुटता आला.

थेट आपल्या पुढ्यात पेंग्विन व डॉल्फिनला पाहून विद्यार्थ्यांनी त्याला हात लावण्याचा प्रयत्नही केला. पेग्विंन व डॉल्फिनला पुढ्यात येताच विद्यार्थी मोठ्याने ओरडून आपला आनंद व्यक्त करत होते. त्याचप्रमााणे सॅटेलाईटच्या माध्यमातून दिसणारा पृथ्वीवरील भूभागही दाखवण्यात आला. यामध्ये समुद्र, समुद्र किनारा, शेतीचा भाग, डोेंगर, डोंगरमाथा व बर्फाच्छादित भाग सॅटेलाईटच्या माध्यमातून कसे दिसतात हेही विद्यार्थ्यांना अनुभवता आले. भला मोठा टाईप रायटर ते संगणक काळानुसार बदलत्या गोष्टींची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारत आपल्या शंका दूर केल्या.

‘विज्ञान सफर’मध्ये नेहरू विज्ञान केंद्रातील विविध प्रयोग पाहून विद्यार्थ्यांनी केंद्रातील शिक्षणाधिकार्‍यांना अनेक प्रश्न उपस्थित करून आपल्या समस्यांचे निराकरण केले. केंद्रातील प्रयोग दिवसभर पाहिल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर कोणताही थकल्याचा भाव दिसून येत नव्हता. याउलट त्यांनी अजून एकदा नेहरू सेंटरमध्ये फिरण्याची इच्छा व्यक्त केली.

बिग बँगचे ज्ञान मिळाले
विज्ञान समागमच्या माध्यामातून जगाच्या उत्पत्तीबाबत सुरू असलेले बिग बँगची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. या संशोधनात भारताचे स्थान कोठे आहे, भारताची भूमिका काय आहे याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. विज्ञान समागन 7 जुलैपर्यंत पाहता येणार आहे. विज्ञान केंद्रामध्ये 12 वेगवेगळ्या विषयांच्या गॅलरीज आहेत. 600 पेक्षा अधिक प्रयोग आहे.

आणखी काय पाहाल
सायन्स ओडिसी, थ्रीडी फिल्म शोज, सायन्स ऑन स्फियर यातून पृथ्वीशी संबंधित गोष्टी पाहायला मिळतात. स्पार्क थिएटर, सायन्स डेमोंस्ट्रेशन लेक्चर आहेत. लाईट अ‍ॅण्ड साईट, साऊंड अ‍ॅण्ड हेअरिंग, सायन्स फॉर चिल्ड्रन, क्लायमेट चेंज, प्री-हिस्टॉरिक अ‍ॅनिमल लाईफ, ह्युमन अ‍ॅण्ड मशीन असे विविध उपक्रम येथे पाहायला मिळणार आहेत.

हसतखेळत विज्ञान ही केंद्राची संकल्पना आहे. केंद्रामध्ये 12 वेगवेगळ्या विषयांच्या गॅलरीज व 600 पेक्षा अधिक प्रयोग आहेत. हे प्रयोग करताना विद्यार्थ्यांना कोणी हटकत नाहीत. सायन्स ओडिसी, थ्रीडी फिल्म शोज, स्पार्क थिएटर, सायन्स ऑन स्फियर यातून पृथ्वीशी संबंधित गोष्टी पाहायला मिळतात. सायन्स डेमोंस्ट्रेशन लेक्चरमध्ये प्रयोग प्रत्यक्षात पाहायला मिळतात. ‘आपलं महानगर’ने राबवलेल्या या उपक्रमाबाबत त्यांचे धन्यवाद. विद्यार्थ्यांना ही नवी दुनिया दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार
– चारुदत्त पुल्लीवार, शिक्षणाधिकारी, नेहरू विज्ञान केंद्र

नेहरू विज्ञान केंद्रामध्ये ‘आपलं महानगर’च्या माध्यमातून आलेली मुले ही आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. शाळेच्या पलिकडे विद्यार्थ्यांना येथे शिकायला मिळते. विज्ञान समागम या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना जगाच्या उत्पत्तीबाबत माहिती मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यास मदत होईल. ‘आपलं महानगर’ला यासाठी खूप सार्‍या शुभेच्छा. महानगरने यापुढेही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये आणल्यास आम्हाला त्याचा आनंद होईल.
– शिवप्रसाद खेणेद, संचालक, नेहरू विज्ञान केंद्र

नेहरू सायन्स सेंटरमध्ये येऊन खूप मजा आली. लिक्विड नायट्रोजनचे दाखवलेेले प्रात्याक्षिक पाहताना भरपूर मजा आली. चांगले वाटले. डायनोसॉर व आकाशगंगेचे कार्यक्रम पाहायला आवडले. या कार्यक्रमाला मला पुन्हा यायला आवडेल.
– नेतन छावडा, विद्यार्थी, विक्रोळी

मुलांना खूप आवडतील असे कार्यक्रम येथे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानात भर पडणारा हा कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम ‘आपलं महानगर’ वारंवार घ्यावेत. याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
– गीता उतेकर, पालक, बाबुलनाथ (लाल ड्रेस)

मला येथे खेळायला आणि बघायला खूप मजा आली. सेंटरमधील हिस्ट्रॉरिक पिरियडमध्ये दाखवण्यात आलेले डायनोसॉर फार आवडले, मला येथील वातावरण खूप आवडले. मला येथे येऊन खूप छान वाटले.
-कोमल उतेकर, विद्यार्थीनी,

‘आपलं महानगर’ने राबवलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आपल्याकडे शिक्षण क्षेत्राकडे फार कमी लक्ष दिले जाते. असे असतानाही ‘आपलं महानगर’ने असा कार्यक्रम केला याबद्दल त्यांचे खरे तर कौतुक केले पाहिजे. ‘आपलं महानगर’ने यापुढे असे कार्यक्रम वारंवार करून मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे.
– निलीमा पावसकर, पालक, ठाणे

स्त्युत्य उपक्रम होता. महानगर असे अनेक उपक्रम करत राहावेत. आपण जेव्हा प्रदर्शन येऊन बघतो. त्यावेळी नुसते पाहून जातो. पण आम्ही तुमच्यासोबत आल्याने आपल्या प्रत्येक गोष्टी समजवून सांगण्यात आल्या. त्यामुळे बर्‍याच चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या. तुमचे धन्यवाद
– पूजा घवाळी, पालक, विलेपार्ले

नेहरू सायन्स सेंटरमध्ये ‘आपलं महानगर’च्या माध्यमातून मला प्रथमच यायची संधी मिळाली. येथे आल्यानंतर विज्ञानातील वेगवेगळे प्रयोग पाहून मी भारावून गेले. शाळेतील प्रयोगापेक्षा हे प्रयोग फारचे वेगळे होते. लाईट अ‍ॅण्ड साईट शो, हिस्टॉरिक अ‍ॅनिमल लाईफ, आकाशगंगेबाबत दाखवण्यात आलेली माहिती हे सर्व पाहुन मला वारंवार सेंटरला येण्याची इच्छा झाली आहे. याबद्दल मी माझ्या शाळेतील मैत्रिणींनाही सांगणार आहे.
– निशा राजपूरे, विद्यार्थिनी, विक्रोळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -