घरक्रीडाविद्यापीठाच्या आंतरकॉलेज स्पर्धेला मुहूर्त सापडेना

विद्यापीठाच्या आंतरकॉलेज स्पर्धेला मुहूर्त सापडेना

Subscribe

एमसीएच्या आडमुठ्या धोरणामुळे स्पर्धेवर गडांतर

‘अश्वमेध’ आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवातील विद्यापीठाचा अनागोंदी कारभार समोर आल्यानंतर आता विद्यापीठाची आंतरकॉलेज क्रिकेट स्पर्धाही वादात सापडली आहे. गतवर्षी आंतरकॉलेज क्रिकेट स्पर्धा अर्धवट सोडून ‘मुंबई प्रिमियर लीग’साठी गेलेल्या सहा खेळाडूंवर विद्यापीठाने कारवाई केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घ्या अन्यथा क्रिकेट सामन्यांसाठी मैदान विसरा असा पवित्रा एमसीएने घेतला आहे. एमसीएच्या वर्तणुकीबाबत विद्यापीठाने कोणताही निर्णय न घेतल्याने यावर्षीच्या आंतरकॉलेज क्रिकेट स्पर्धेवर गडांतर आले आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी आंतरकॉलेज क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येते. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजचे संघ यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंतच्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवून राष्ट्रीय स्पर्धांचे दरवाजे ठोठावण्याची संधी यातून मिळते. गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या संघासह 250 संघ सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र, त्याचवेळी विद्यापीठाचे सहा खेळाडू स्पर्धा अर्धवट सोडून एमसीएच्या ‘मुंबई प्रिमियर लीग’साठी गेले. यामुळे विद्यापीठावर सेमी फायनलमध्ये नऊ खेळाडूंसह खेळण्याची नामुश्की ओढवली. विद्यापीठाच्या संघाला पराभवाचाही सामना करावा लागला. विद्यापीठाने सहाही खेळाडूंवर कारवाई केल्यामुळे एमसीएने ताठर भूमिका घेत विद्यापीठाची अडवणूक केली आहे.

- Advertisement -

मुंबईमधील क्रिकेट मैदाने हे एमसीएच्या अंतर्गत येतात. त्यामुळे एमसीएने आंतरकॉलेज स्पर्धेसाठी मैदाने हवे असल्यास खेळाडूंवरील कारवाई मागे घ्या, असे इशारावजा पत्र विद्यापीठाला पाठवले. एमसीएच्या पत्राची विद्यापीठाने गंभीर दखल न घेतल्याने यावर्षीच्या आंतरकॉलेज क्रिकेट स्पर्धेवर गडांतर आले. त्यामुळे दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारी ही स्पर्धा फेब्रुवारी संपत आला तरी स्पर्धेबाबत सूचना जाहीर करण्यास विद्यापीठाला मुहूर्त सापडत नाही.

क्रीडा संचालकाच्या भरतीबाबत अनास्था
मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे संघ विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात, परंतु या विभागाचे संचालक पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. ते भरण्याबाबत जाहिरातही देण्यात आली. मात्र, निवडीसाठी राज्यपालांकडून समिती पाठवण्यात न आल्याने हे पद अद्यापही रिक्त आहे.

- Advertisement -

आंतरकॉलेज क्रिकेट स्पर्धेतून खेळाडूंना चांगली संधी मिळते. त्यामुळे एमसीएने केलेल्या अडवणुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. एमसीएच्या आडमुठ्या धोरणाबाबत आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांची भेट घेऊन त्यांना यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती करणार आहे.
– प्रदीप सावंत, मॅनेजमेंटकाऊन्सिल सदस्य, मुंबई विद्यापीठ

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -