घरमुंबईपोटाची खळगी भरणारा वडापाव महागणार, पण कारण काय?

पोटाची खळगी भरणारा वडापाव महागणार, पण कारण काय?

Subscribe

मुंबई – महाराष्ट्राचा प्रामुख्याने मुंबईकरांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. अलीकडे वडापावचे अनेक नवनवीन प्रकार आपण पाहतो. छोट्या स्टॉलपासून ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये देखील वडापावला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. मुंबईमध्ये येणारा असा एकही माणूस नसेल ज्याने कधी वडापाव खाल्ला नाही. पण वडापाव प्रेमींसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. येत्या काही दिवसांत वडापाव महागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढली आहे. सगळ्याच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत आहेत. खाद्यपदार्थांपासून सर्वच मूलभूत गरजांसाठी अधिकचे पैसे द्यावे लागतात. अशातच, सामान्य नागरिकांच्या पोटाची खळगी भरणाऱ्या वडापावच्या किंमती आता वाढण्याची शक्यता आहे. कारण, पावाच्या किमतीत वाढ होणार आहे. पाव बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ होणार असल्याने वडापावचीही किंमत वाढणार आहे. एवढंच नव्हे तर पावासोबत खालले जाणारे सर्वंच पदार्थ महागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “हा तर वडापाव सारखा”……अल्लू अर्जुनचं वाढलेले वजन पाहून युजर्सने केलं ट्रोल

पावाचा दर साधारणतः २ रुपये प्रति पाव असा होता. तर, १२ रुपये प्रति लादी किंमत होती. एका लादीत सहा पाव मिळतात. मात्र, पावाच्या कच्च्या मालात वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे पावाची किंमत अडीच ते तीन रुपये झाली आहे. त्यामुळे सहा पावांची एक लादी आता १६ रुपयांना मिळणार आहे. परिणामी पावासोबत खालले जाणारे सर्वच पदार्थ महागणार आहेत. पावासोबत वडा जास्त खालला जाणार असल्याने वडापावप्रेमींच्या खिशाला अधिकचा भूर्दंड बसणार आहे.

- Advertisement -

वडापावची किंमत किती?

मुंबईसह आजूबाजूच्या शहरात वडापावची किंमत १२ ते १५ रुपये आहे. छोट्या स्टॉल्सवर १२ ते १५ रुपयांत वडपाव विकला जातो. एखाद्या हॉटेलमध्ये याची किंमत अधिक वाढते. तसंच, आजूबाजूच्या जागेनुसार, वडापावच्या किंमती वाढतात. दोन आण्यापासून सुरू झालेल्या या वडापावची किंमत आता १५ ते २० रुपये झाली आहे. तसंच, अनेक महागड्या ठिकाणी अगदी १०० रुपयांपर्यंतही वडापाव मिळतो. आता पावाची किंमत वाढल्यास १२ ते १५ रुपयांपर्यंत असलेल्या वडापावाची किंमत दोन ते तीन रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. तसंच, भजीपाव, मिसळपाव यांच्याही किंमती वाढू शकतात.

काय आहे वडापावचा इतिहास?

1960 मध्ये अशोक वैद्य या गृहस्थांनी वडा पावचा शोध लावला. त्यांचा दादर स्टेशन बाहेर एक फूड स्टॉल होता. त्यावेळी बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्यापेक्षा त्यांनी बटाट्याची भाजी बनवून तिला बेसन पीठामध्ये बुडवून त्याचा वडा तयार केला. आणि चपाती ऐवजी तो पावाबरोबर खाल्ला दिला जाऊ लागला. त्या काळात सर्वसामान्यांना परवडेल आणि पोट भरेल असा वडापाव हळूहळू प्रसिद्ध झाला. त्याकाळात 1970 ते 1980 च्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडल्याने अनेकांनी वडापावकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले. दरम्यान, हळूहळू ठिकठिकाणी वडापावचे गाडे दिसू लागले. राजकीय पाठबळामुळे हळूहळू मराठी तरूण मंडळी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू लागले. वडापावला आता महाराष्ट्रातंच नाही तर विदेशात देखील मानचे स्थान प्राप्त झाले आहे.

पावाच्या किंमती कमी जास्त होतातच

पावाच्या किंमती कमी जास्त होत असतात. त्यामुळे आम्ही वडापावची किंमत वाढवणार नाहीत. सध्या आमच्याकडे १४ रुपये वडापाव आहे. त्यामुळे पावाची किंमत वाढली तरी वडापावची किंमत तेवढीच राहणार आहे.

– दीपक नागम, वडापाव विक्रेता, दिवा

ठाण्यात किमती वाढल्या

पावाची लादी महाग झाली आहे. सध्या सहा पावांची लादी १५ रुपयाला मिळते. येत्या काळात आणखी महाग होणार आहे. परंतु, आम्ही वडापावची किमत वाढवणार नाही. नुकतेच सगळे कोरोनातून बाहेर पडले आहेत. त्यात आमचा फार जुना व्यवसाय असल्याने इतर वडापाव विक्रेतेही आमच्या किमतीकडे लक्ष ठेवून असतात. सध्या ठाण्यातील अनेक वडापाव विक्रेत्यांनी वडापावच्या किमती वाढवल्या आहेत. परंतु, आम्ही अजूनही १५ रुपयेच वडापाव ठेवला आहे. येत्या काळात किंमत वाढवण्याचा विचार करू.

– वैशाली हर्षे, खिडकी वडापाव, ठाणे

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -