घरमुंबईभूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थ हादरले

भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थ हादरले

Subscribe

अनेकांचे स्थलांतर, विद्यार्थी शाळेत परतलेच नाही

गेल्या महिनाभरापासून वारंवार बसत असलेल्या भूकंपांच्या धक्क्यांमुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामस्थ भयभीत झाले असून शेकडो ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. हजारो विद्यार्थी शाळेत परतले नाही. 11 नोव्हेंबरपासून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सासवद, धुंदलवाडी, घोलवड, दापचरी, बहारे, वसा, करंजगाव या गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत.
आतापर्यंत महिनाभरात सुमारे 3.3 रिश्टर स्केलचे सात-आठ धक्के बसले आहेत. 11 नोव्हेंबरला डहाणूतील धुंदलवाडीत 3.2 रिश्टर स्केलचा पहिला धक्का बसला. त्यानंतर 24 नोव्हेंबर,2 आणि 4 डिसेंबरला 3.3,8 डिसेंबरला 2.9,9 डिसेंबरला 2.8 रिश्टर स्केलचे धक्के बसले. या धक्क्यांसह सौम्य स्वरुपाचे धक्के वारंवार बसत असल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या धक्क्यांमुळे काही ग्रामस्थांच्या घराला तडेही गेले आहेत.

भूकंपाच्या भीतीमुळे डहाणू तालुक्यातील पूर्वेकडील शेकडो ग्रामस्थांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. तर धुंदलवाडी आश्रमशाळेतील 700 आणि चिंचले आश्रमशाळेतील 400 विद्यार्थी दिवाळीची सुट्टी संपली तरी शाळेत परतलेले नाहीत. सावधगिरीचा उपाय म्हणून हजारो ग्रामस्थ रात्री घराबाहेर जागरण करीत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या परिसरात भूकंपाचे कधीही धक्के बसले नव्हते. आताच हे धक्के बसत असल्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तज्ञांकडून 11 ते 13 डिसेंबर दरम्यान तीन दिवस पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

भूकंपामुळे हादरलेल्या ग्रामस्थांची भीती दूर करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, डहाणूचे तहसिलदार राहुल सारंग आणि नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विशाल नातेकर यांच्याकडून धुंदलवाडीतील आश्रम शाळेत ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -